Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

रिक्षांची भाडेवाढ बेकायदेशीरच; शेअरिंगच्या नावाखाली लुटमार

Share

नाशिक | खंडू जगताप : शहरात रिक्षाचालकांनी केलेली भाडेवाढ ही आरटीए समितीला अंधारात ठेवून परस्पर केली असून ही बेकायदेशीरच असल्याचे आरटीओ (प्रादेशिक परिवहन विभाग) ने स्पष्ट केले आहे. तक्रारदार पुढे आल्यास अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे.

रिक्षांना आरटीओची परवानगी (परमीट) हे तीन प्रवाशी वाहून नेण्यासाठीच आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रिक्षांना असलेल्या परमीटनुसारच 3 प्रवाशांची वाहतूक करावी, असे आदेश दिले होते. परंतु शेअरिंगच्या नावाखाली सहा सात प्रवाशी रिक्षात कोंबून वाहतूक करण्याची सवय लागलेल्या रिक्षाचालकांनी यास कडाडून विरोध केला.

अघोषित बंद पुकारून नाशिककरांना वेठीस धरून पोलिसांचा निर्णय चुकीचा असल्याचे भासवण्यात आले. तर दुसरीकडे शहरात वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आम्ही तीनच प्रवाशी रिक्षात बसवणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यास सुरुवात केली. अशा वाहतुकीत परवडत नसल्याचे कारण पुढे करत प्रत्येक मार्गावर प्रत्येक थांब्यासाठी 5 ते 20 रुपये दरवाढ केली. तर आंदोलन पुकारून पोलीस कारवाई मागे घेण्यास भाग पाडले. परंतु पोलीस कारवाई थंडावताच रिक्षाचालकांनी पुन्हा रिक्षामध्ये पाच ते सहा प्रवाशी कोंबण्यास सुरुवात केली. मात्र वाढवलेले दर कमी केले नाहीत. यामुळे प्रवाशी व रिक्षाचालकांमध्ये तू तू-मै मै सुरू आहे.

शहरात प्रवाशी वाहतूक करणार्‍या रिक्षा, टॅक्सी, टॅ्रव्हल बस यांचे वाहतूक दर ठरवण्यासाठी तसेच त्यांच्यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली रोड ट्रॅफिक अ‍ॅथोरटी (आरटीए) ही समिती कार्यरत असते. या समितीमध्ये आरटीओ, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत व्यक्ती, रिक्षा चालकमालक संघटनांचे प्रतिनिधी आहेत.

ही समिती दरवाढ करताना वाहनाची प्रवाशी क्षमता, पेट्रोल, डिझेलचे दर, वाहनाचा घसरा असा एकूण होणारा खर्चाचा विचार करूनच प्रवासाचे दर सर्वानुमते निश्चित करते. कोणत्याही प्रकारची दरवाढ करताना आरटीए समितीच्या मंजुरी शिवाय दरवाढ करता येत नाही, असे असतानाही रिक्षाचालक व मालक संघटनांनी केलेली दरवाढ ही बेकायदेशीर असल्याचे आरटीओने स्पष्ट केले असून असे वाढीव पैसे प्रवाशांनी न देण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे.

तर कडक कारवाई
आरटीए समितीच्या संमतिशिवाय करण्यात आलेली रिक्षांची भाडेवाढ ही बेकायदेशीर ठरते. यामुळे प्रवाशांनी बेकायदेशीर दरवाढीचा भुर्दंड सोसू नये. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आरटीओला प्राप्त झाल्यास अशा रिक्षांवर आरटीओतर्फे कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी नाशिककर प्रवाशांनी पुढे यावे.
-भारत चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!