Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जायकवाडी धरण @८६ टक्क्यांवर

Share

नाशिक । गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरण आज सकाळपर्यंत ८६.९८ टक्क्यांवर पोहोचले. धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परळी थर्मलसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान जायकवाडी धरणाची पाणीक्षमता सव्वाशे टीएमसी असून आज सकाळी ५२९१६ क्युसेक इतकी आवक सुरु आहे. तसेच माजलगावसाठी उजव्या कालव्यातून ८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे तर डाव्या कालव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर-मधमेश्वरमधून येणारा विसर्ग कमी होत असला तरी निळवंडे धरणातून सुटलेले पाणी जायकवाडीत येत असल्यामुळे पाणीसाठा वाढत आहे.

जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलैच्या मध्यानंतर पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या आठवड्यात बरसल्यानंतर मधल्या काळात त्यांने विश्रांती घेतली होती. मात्र जुलै अखेर पावसाचे जोरदार आगमन झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा तसेच नाशिक या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गोदावरी, दारणांसह अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आले. परिणामी जायकवाडीला आवक मोठ्याप्रमाणावर झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढली.

नाशिकची तहान भागवणारे गंगापूर धरण जवळपास ९० टक्के भरल्याने त्यातून ४५ क्यूसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरु होता. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली होती. तब्बल ५९ वर्षानंतर गोदावरीला यंदा महापूर आला. इतर छोटी-मोठी धरणे देखील ओसंडू लागल्याने त्यातून विसर्ग सुरु आहे. तसेच पैठण जलविद्युत केंद्रामधुन आज सकाळी नऊ वाजेपासून १५८९ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपत्रात सोडण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!