Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मराठवाडा मुक्ती संग्राम : १३ महिन्यांनी उगवली स्वातंत्र्य पहाट; स्वातंत्र्याची ‘सत्तरी’ पूर्ण

Share

नाशिक : औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांनी बनलेल्या मराठावाड्यासाठी आज (दि. १७) चा दिवस खास असून याच दिवशी मराठवाड्यास स्वातंत्र्य मिळाले. म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये ५६५ संस्थानापैकी ५६२ संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर सहाजिकच, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच, आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते.

भारताच्या पोलिसी कारवाईनंतर १७ सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलनीकरण भारतात करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्याला १५ ऑगस्टऐवजी १७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाडा मुक्ती संग्रामाला आज ७० वर्षे झाली.

भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने ८ जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता.

हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले.

या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.

दरम्यान पहिल्यांदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन झाली आणि हा दिवस मोठ्या उत्साहात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये साजरा केला जाऊ लागला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!