नाशिकला तात्काळ हवेत १०० कोटी

एटीएम सेवा पूर्ववत होण्यास आठवडा लागणार?

0
नाशिक | दि. १६ प्रतिनिधी- अपुर्‍या चलनपुरवठ्याने ठप्प झालेली एटीएम सेवा पूर्ववत होण्यास आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध होत नसल्याने बँकांकडून एटीएमऐवजी शाखेत कॅश ठेवण्याला प्राधान्य दिले जात आहे.
आज निर्माण झालेली चलनटंचाई सुरळीत होण्यासाठी शहरातील बँकांना तातडीने १०० कोटींची आवश्यकता असून तशी मागणीही करन्सी चेस्टने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे कळवली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेनेच अद्याप करन्सी चेस्टला चलनपुरवठा न केल्याने चलनकोंडी सुटण्यास अडचण निर्माण झाली आहे.

केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यातच चलन तुटवडा निर्माण झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बँका आणि रिझर्व्ह बँकेतील मतभेदांमुळे ग्राहकांना मात्र पैसे काढण्यासाठी उन्हाचे चटके सहन करत वणवण भटकावे लागत आहे. मार्चच्या तिसर्‍या आठवड्यापासून चलनपुरवठा कमी होत गेला. आता तर गेल्या आठवडाभरापासून मागणीच्या तुलनेत निम्म्याहून कमी रक्कम आरबीआयकडून प्राप्त होत असल्याचे एका बँक अधिकार्‍याने सांगितले.
एटीएम व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांनीदेखील रोख रकमेचा पुरवठा कमी होत असल्याचे मान्य केले आहे. फेब्रुवारीअखेर बँकिंग यंत्रणा नोटबंदीतून सावरली होती. प्रत्येक एटीएमसाठी दर दोन ते तीन दिवसांनी १८ ते २० लाखांचा भरणा केला जात होता. मात्र आता हे प्रमाण तीन ते पाच लाखांपर्यंत कमी झाले आहे. त्यातच पैसे काढण्याची मर्यादा शिथिल केल्याने जेमतेम ५ ते १० ग्राहकांना एटीएममधील पैसे उपलब्ध होतात. त्यानंतर दिवसभर एटीएम कोरडेठाक असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

 

अनेकांना विवाह सोहळ्यांसाठी तर काहींना औषधोपचासाठी रोख रक्कम हवी आहे. सर्वसामान्यांना दररोजचे खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज आहे. अशा एक ना अनेक कारणांसाठी शहरातील बँकेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र बँकांच्या तिजोरीतच खडखडाट असल्याने त्यांना पैसे द्यायचे कसे, असा प्रश्‍न बँकांना पडला आहे.
आजही शहरातील बँकांचे कामकाज नियमित वेळेनुसार सुरू झाले, मात्र बहुतांश बँकांकडे रोकडच नसल्याने व्यवहार मात्र ठप्प होते. पुरेशा प्रमाणात बँकांना रोकड उपलब्ध होत नसल्याने किरकोळ रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने ग्राहकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेव्हाच परिस्थिती सुधारेल…
नाशिक शहरातील बँकिंग व्यवस्था सुरळीत सुरू होण्याकरिता आजमितीस किमान १०० कोटी रुपयांची तातडीने आवश्यकता आहे. तशी मागणीही रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली आहे. मात्र आरबीआयकडून अद्याप चलनपुरवठा करण्यात आलेला नाही. आज शहरात मागणीच्या अवघे १० टक्के चलनसाठा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जेव्हा आरबीआयकडून करन्सी चेस्टला चलनपुरवठा केला जाईल तेव्हाच ही परिस्थिती सुरळीत होईल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

बँकांची तारांबळ
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मागणी करूनही अपुरा अर्थपुरवठा होतो. बँकांकडून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रोजच्या गरजेनुसार चलनपुरवठ्याची मागणी होते, परंतु तरीही करन्सी चेस्टकडे येणारी रक्कम १० टक्केच आहे. त्यातून मार्ग काढणार तरी कसा? रेशनिंग सिस्टीमही किती दिवस राबवणार? खातेदारांच्या रोषाला किती वेळा सामोरे जाणार? असे विविध प्रश्‍न बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित करत आहेत. साहजिकच बँकेत जमा झालेली रोकड आणि खातेदारांनी केलेला भरणा यावर अन्य नागरिकांची गरज भागवावी लागत आहे. उपलब्ध रोकडनुसार एटीएम केंद्रांवर पुरवठा करण्यात येत आहे. मुळात बँकेत भरणाही होत नसल्याचे चलनटंचाई होण्यामागचे आणखी एक कारण बँक अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.
व्हायरस नव्हे चलन तुटवडा
रॅनसमवेअर व्हायरसच्या हल्ल्याच्या भीतीमुळे एटीएम बंद ठेवल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्ह्यात चलनच उपलब्ध नसल्याने एटीएम बंद ठेवण्यात आल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. मुळात आपल्याकडे एटीएममध्ये वापरली जाणारी विंडोज एक्सपी यंत्रणा जुनी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तरी असा कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे.
एटीएमबाहेर मोठ्या रांगा
खासगी बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेक भागातील एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहेत. मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांचे क्षेत्रीय कार्यालयाजवळील एटीएम सुरू असल्याने या केंद्रावर पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात.

LEAVE A REPLY

*