‘डिजिवूड’मध्ये नाशिककरांचा प्रवेश; ‘वेबसिरीज’मुळे कलावंतांना नवे ‘क्षितीज’

0

नाशिक । नील कुलकर्णी
नाशिक शहराला कला आणि कलाकारांचा मोठा आणि संपन्न वारसा लाभला आहे.

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या या चित्रनगरीतून नव्या दमाच्या कलाकारांनी वेळोवेळी आपल्या कलेचा ठसा चित्रपट, नाट्य आणि ‘डेलीसोप्स’ (टीव्ही मालिकां) वर उमटवला आहे.

सध्या युट्यूबवरील वेबसिरीजमुळे उदयोन्मुख कलावंतांना करिअरचे नवे दालन खुले झाले असून अभिनय, चित्रीकरण, व्हिडीओ संकलन असा सृजनशील क्षेत्रात येथील कलावंतांनी आपल्या कलेची मोहर वैश्विक पातळीवर उमटवत आहे.

साधारणत: सन 1995 ते 2010 या काळात मालिका अथवा चित्रपटात अभियन करायचा ठरवले तर पोर्टफोलिओ, कॅमरार्‍यासमोरील ऑडिशन आणि तत्सम ‘अग्नीदिव्या’(काहींनी कास्टिंग काऊचाही सामना केला) तून कलाकारांना पार पडावे लागत असे.

मात्र वेबसिरीजमुळे अनेक कलाकारांना विनासायास अभिनय आणि इतर कला सादरीकरणांच्या संधी आपल्या नगरीतच उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या दशकाच्या उत्तरार्धात स्मार्ट फोन आणि या दशकाच्या प्रारंभी सेल्युलर कंपन्यांनी इंटरनेट सुविधेचे दर कमी केल्यामुळे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट, टॅब, फोन आले.

त्यामुळे तरुणाईस अनेक जण इंटरनेटवरून तत्काळ हवी ती गोष्ट ‘सर्फिंग’ करून माहिती आणि कलेची भूक भागवत असल्याने ही गोष्ट कलावंताच्या पथ्यावर पडली. कलाकारांची पूर्वी होणारी मुंबईची ससेहोलपट थांबली. आज अत्यंत कमी खर्चात नाशिकचे कलावंत उच्च सादरीकरण मूल्य वापरून सृजनशील मालिकांची आणि लघुपटांची निर्मिती करत आहे.

‘सबकुच्छ’ नाशिकचे अशी ओळख असलेली ‘आतरंगी’ ही वेबसिरीज सध्या खूपच चर्चेत आहे. ऋषिकेश सरोदे, अविनाश पोळ आणि मयूर तुपे या त्रयींनी विनोदी बाजाची अत्ंयत चांगली ग्रामीण मालिका बनवली असून त्याचे दोन भाग यूट्युबवर प्रदर्शित झाले आहेत.

येत्या काही दिवसांत तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यासाठीचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आहे. या नव्या माध्यमांमुळे नवकलाकारांना अभिनय आणि संबंधित क्षेत्रात करिअरचे नवे दालन खुले झाले आहे.

कलावंतांना वैश्विक मंच
आमच्या अतरंगी वेबसिरीजमुळे नाशिकच्या कलावंतांना करिअरचे नवे दालन खुले झाले आहे. यामध्ये काम करणार्‍या अविनाशला तर दोन चित्रपटात अभिनयाची संधी या मालिकेमुळे मिळाली. ग्रामीण पार्श्वभूमी, विनोदी धाटणीची ही आमची निर्मिती शहरातील प्रथम सिरीज ठरली आहे. दर्शकसंख्या आणि प्रतिसाद वाढल्यास आम्हाला यूट्युबकडून मानधन मिळण्यासोबतच चित्रवाणीवर मालिका बणवण्याची संधी मिळणार आहे. अवघ्या काही हजारात आम्ही मालिका पूर्ण केली असून येत्या काळात त्यांना मानधनही देण्याचा विचार आहे. –ऋषिकेश सरोदे, लेखक, दिग्दर्शक

मनोरंजनाचे नवे पर्व
हल्ली लोकांना चित्रपटगृहात जाऊन तीन तास चित्रपट पाहण्यास वेळ नसतो. शिवाय जगही स्मार्ट होत आहे. त्यामुळे कमी वेळात मोबाईलवर हलकेफुलके मनोरंजन पाहण्यार्‍यांची संख्याही वाढली. म्हणून येत्या काळात वेबसिरीजद्वारे कलाकारांची कलेची भूक भागवली जाईल. शिवाय दर्शकानाही अत्यल्प वेळेत भरपूर मनोरंजन होणार आहे. कलावंतांचा पूर्वी मालिकांमध्ये शिरताना होणारा स्ट्रगल वाचणार आहे. मला स्वत:ला वेबसिरीजमुळे प्रेमाच्या वाटेवर आणि आणखी एका चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. नव्या माध्यमांना सत्याभासी मीडिया म्हटले जाते. मात्र ज्यांचा कलेचे नाणे खणखणीत आहे, अशांना हे नवे संक्रमण खुणावत आहे.
-अविनाश पोळ, अभिनेता

मनोरंजनाचे डिजिटायजेशन
हल्लीची पिढी चित्रपट, वाचन, माहिती आणि मनोरंजनासाठी पूर्णपणे मोबाईलवर विसंबली आहे. साहजिकच येत्या काही काळात वेबसिरीज आणि लघुपटांना सुगीचे दिवस येणार, असे माध्यम तज्ञांचे मत आहे. वेळेची कमतरता आणि मोबाईलची उपलब्धता, ते हाताळण्याची सुलभता, सेल्युलर कंपन्यांच्या सवलती यामुळे मनोरंजनासाठी चित्रपट-नाट्यगृहात जाणार्‍यांची संख्या लक्षणीय घटली आहे. साहजिकच मनोरंजन क्षितीजावर वेबसिरीचा तारा उदयास आला आहे.

LEAVE A REPLY

*