नाशिक | सेंच्युरी एशियातर्फे दिला जाणारा ‘वाईल्ड लाइफ फोटोग्राफी अवार्ड-२०१७’  आनंद बोरा मिळाला आहे. ‘कॉन्झर्वेशन’ गटात बिबट्याची विहीरीतून सुटका या छायाचित्राला प्रथम पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे नुकताच परितोषिक वितरण समारंभ पार पडला.
छत्तीसगड पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सिंग यांच्या हस्ते बोरा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बिट्टू सहगल, संजना कपूर, वैजयंती माला, असिफ लालजी, डॉ परविश पांड्या, सुनिता परवाला, केतकी सेठ यांची उपस्थिती होती.
सुरगाणा तालुक्यातील बुबळी या गावात एक बिबट्या विहिरीत पडला होता. तब्बल तीस तास तो विहिरीत अडकला होता. नाशिक वन विभागाच्या वन्यजीव सुटका चमूचे वन परीक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर आणि उपायुक्त पशु वैद्यकीय डॉ. संजय गायकवाड यांनी गावकर्‍यांच्या मदतीने  बिबट्याला खाट व गाडीचे टायर वापरुन विहीरीबाहेर सुखरुप काढले होते.  हे थरार ‘सुटका नाट्य’ आनंद बोरा यांनी कॅमेरार्‍यात बंद केले होते. अगदी दहा फुटाच्या अंतरावरून त्यांनी ही छायाचित्रे काढली होती.
हे छायाचित्र वन्यजीवनावर निघणार्‍या नियतकालिकामध्ये देखील छापण्यात आले होते. त्यावर संपादकीय लेख देखील लिहिण्यात आला आहे.  वन्यजीव छायाचित्रकारांसाठी सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार मिळाल्या बद्दल बोरा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

*