गुजरातमुळेच नाशिकची विमानसेवा साईड ट्रॅकवर – खा. हेमंत गोडसे यांचा आरोप

0
नाशिक । एकीकडे मुंबई विमानतळावर टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत नाशिकच्या विमानसेवेसाठी वेळ उपलब्ध करून दिली जात नाही. मात्र दुसरीकडे गुजरातमधील सुरत, पोरबंदर, कांडला या तीन विमानतळांसाठी मुंबई विमानतळावर वेळ उपलब्ध करून दिल्याने गुजरातसाठी महाराष्ट्रातील विमानसेवेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप खा. हेमंत गोडेस यांनी केला आहे.

84 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने एचएएलच्या मदतीने ओझर येथे दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या नाशिक विमानतळावरील ‘टेक ऑफ’ची प्रतीक्षा शिर्डी विमानतळ कार्यरत झाल्याने आता अधिकच वाढणार आहे. किंबहुना नजीकच्या भविष्यात नाशिक विमानतळ कार्यरत होण्याबाबत या क्षेत्रातील जाणकारांकडून साशंकता व्यक्त होत असून या विमानतळाचा पांढरा हत्ती पोसावा लागेल, अशी चिन्हे आहेत.

विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा याकरिता केंद्राच्या उडान योजनेंतर्गत ज्या प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला त्यात नाशिकचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे आता तरी नाशिककरांचे उडानचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.

मात्र मुंबई विमानतळाचे नियंत्रण करणार्‍या जी.व्ही.के. कंपनीने वेळेची उपलब्धता नसल्याचे कारण दिल्याने उडान होऊ शकले नाही. नाशिकहून बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली या शहरांना होपिंग फ्लाईट सुरू व्हावी, अशी नाशिककरांची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून आहे.

मात्र नाशिक विमानसेवेसाठी वेळेची उपलब्धता नसल्याचे कारण देत जी.व्ही.के.ने दुसरीकडे मात्र गुजरातच्या सुरत, पोरबंदर व कांडला या तीन विमानतळांसाठी मुंबई विमानतळावर वेळ उपलब्ध करून दिल्याने हा नाशिककरांवर अन्याय असल्याची भावना खा. गोडसे यांनी व्यक्त केली.

गुजरातसाठी राज्यातील विमानसेवा साईड ट्रॅक केल्याचा आरोपही गोडसे यांनी केला. आता तर शिर्डी विमानतळामुळे नाशिकहून लवकरच टेक ऑफ होईल ही अपेक्षाही फोल ठरू पाहत आहे.

LEAVE A REPLY

*