Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘अवकाळी’नंतर आता गुलाबी थंडीची चाहूल

Share

नाशिक : सुधाकर शिंदे 

जम्मू-काश्मीरसह शेजारील राज्यात एक महिना अगोदरच बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तसेच देशातील पश्चिम किनारपट्टी भागात पश्चिम बंगाल व ओडिशा या ठिकाणी बुलबुल वादळाने धडक दिली आहे. त्यामुळे देशात हवामानात बदल झाला असून क्यारनंतर महाचक्रीवादळदेखील गुजरातकडून ओमानच्या दिशेने सरकले आहे. असे असले तरी राज्यात मात्र तब्बल पाच महिन्यांनंतर प्रथम कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली असून यामुळे सर्वच भागात कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत घट झाल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

यंदा राज्यात विक्रमी पाऊस झाल्याने पुढच्या तीन महिन्यांत थंडीची विक्रमी नोंद होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
राज्यात यंदा जूनऐवजी खर्‍या अर्थाने पाऊस जुलै महिन्यात सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात विक्रमी पाऊस झाला. या पावसाच्या महाप्रकोपाची झळ सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांना बसली.

त्यानंतरदेखील अगदी ऑक्टोबरपर्यंत पडत राहिलेल्या परतीच्या पावसाने राज्यातील सर्वच भागातील पिके नष्ट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या लांबलेल्या पावसामुळे आता राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागातील तापमानात घट होणार असल्याने थंडी अवतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मोसमी पाऊस देशातून परतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावत ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण केली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊन गेल्या महिनाभरात क्यार, महाचक्रीवादळाची मालिकाच निर्माण झाली होती.

परिणामी ऑक्टोबर महिन्यासह नोव्हेंबरच्या प्रारंभी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर आलेल्या बुलबुल या अतितीव्र चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशा किनारपट्टीवर धडक दिली आहे. पश्चिम बंगाल समुद्रातील उबदारपणा आणि वातावरणातील दोन थरातील वार्‍यांच्या वेगातील तफावतीमुळे पुढील काही दिवसांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. परंतु त्याचा राज्याच्या वातावरणावर फारसा परिणाम होणार नाही.

परतीच्या आणि लांबलेल्या पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले. जूननंतर एकदाही राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती बघायला मिळाली नव्हती. पाच महिन्यांत काही आठवडे वगळता इतर सर्व दिवस पावसाची शक्यता किंवा ढगाळ स्थितीचा अंदाज वेधशाळेने दिला आणि तो खरा झाला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान वाढले, तर रात्रीच्या किमान तापमानात काहीशी घट अशी स्थिती काही दिवसांपासून दिसून येत आहे.

सध्या दोन्ही तापमानात घट होत असून रात्रीचा गारवा वाढणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आले आहे. अहमदनगर, नाशिक, महाबळेश्वर, मुंबई, रत्नागिरी, गोंदिया आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अलिबाग, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी या ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या
आसपास आहे.

थंडीचा जोर, मुक्काम वाढणार
गत नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नाशिकचे किमान तापमान 14 अंशावरून 11 अंशावर गेले होते. याच महिन्यात 13 नोव्हेंबर रोजी राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी अशी 11 अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. नंतर 17 डिसेंबरला नाशिकचा पारा 8.5 अंशावर आणि 19 डिसेंबरला तो 7.9 अंशावर गेला होता. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी पारा 5.7 अंशावर खाली आला होता. अशाप्रकारे गत वर्षात 27 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्यात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. यंदा जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने यानुसार यंदा थंडीच्या विक्रमाबरोबरच थंडीचा मुक्कामदेखील वाढण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!