दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तात्काळ परत करावे : अभाविप

0

नाशिक : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तात्काळ परत मिळावे अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात अभाविप नाशिकतर्फे निवेदना मार्फत करण्यात आली.

राज्यात यावर्षी पर्ज्यन्यवृष्टी कमी झाल्यामुळे शेतकरीवर्ग दुष्काळाला तोंड देत आहे. महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन केले असता महाराष्ट्रातील १८० तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. सर्व परिस्थिती विचारात घेता महाराष्ट्र शासनाने त्या तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्याकरिता विविध सवलीती लागू केल्या आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात यावी असे नमूद केले आहे, याच मुद्द्याकडे अभाविपने विद्यापीठाचे नाशिक विभागीय समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांचे लक्ष वेधले व छात्रहितासाठी खालील मागण्या विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाकडे केल्या.

१) ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना ते शुल्क प्रक्रिया राबवून तात्काळ परत करावे, व दुष्काळाशी लढण्याचे सामर्थ्य द्यावे.

२) ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे बाकी आहे त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क विद्यापीठाने आकारू नये तसे आदेश आपण संलग्नित महाविद्यालयांना द्यावेत.

सदर विषया संदर्भातील परिपत्रक काढून त्वरित कार्यवाही करावी अन्यथा अभाविप छात्रहितासाठी तीव्र आंदोलन करेल असा इशारा अभाविपने दिला.
यावेळी अभाविपचे महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, सौरभ जोशी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*