मागण्यांसाठी ‘आशा’ची जि.प.वर धडक; दीड हजार महिलांचा मोर्चात सहभाग

0
नाशिक । जिल्ह्यात आशा व आशा गटपवर्तक कर्मचारी म्हणून जि.प.अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे दीड हजार महिला कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

दरमहा वेतन, थकित मानधन द्यावे, लसीकरण कामांचा मोबदला आदी 12 प्रलंबित मागण्यासाठी आशा व आशा गटपवर्तक महिलांनी आज दुपारी बी. डी. भालेकर मैदानावरून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

मागण्या पूर्ण करण्याच्या घोषणा देत, फलक हाती घेऊन थाळीनाद करीत आशा कर्मचार्‍यांनी भालेकर मैदान येथून शालीमार चौकामार्गे नेहरू उद्यान, एम. जी. रोड, शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस सिग्नल, जुने एनडीसीसी मुख्यालय, त्र्यंबकनाका येथून जि.प.मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे कूच केले.

मोर्चाचे नेतृत्व आयटकच्या अंतर्गम राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटनेने केले. मोर्चात अध्यक्ष राजू देसले, जिल्हा सरचिटणीस सुवर्णा मेतकर, जिल्हा संघटक विजय दराडे, राज्य कौन्सिल सदस्य माया घोलप, सुमन बागूल यांनी केले.

जि. प. प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा व गटपवर्तक म्हणून जिल्ह्यात महिला कार्यरत आहेत. त्यांना अल्प मानधन देऊन सरकार काम करून घेत आहे. त्याचबरोबर या कर्मचार्‍यांचे मानधन थकित असते.

शासकीय जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कर्मचार्‍यांना सन्मानजक वागणूक दिली जात नाही. त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेतले जाते.

शासनाने दरमहा 1 हजार रुपये दरमहा मानधन देण्याचे आश्वासन पाळावे, तसेच या दिवाळीत या कर्मचार्‍यांना भाऊबीज द्यावी, दरमहा 15 हजार रुपये वेतन द्यावे, कुष्ठरोग सर्वेक्षण, लसीकरण कामाचा दररोजचा मोबदला 300 रुपये द्यावा, आशा कर्मचार्‍यांना मेडिकल कीट, स्टेशनरी, आवश्यक अर्जांचा पुरवठा करावा, आरोग्य खात्यातील रिक्त पदांवर आशा कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, लसीकरण, शौचालय बांधकामासाठी जनजागृती करण्याचे थकित मानधन द्यावे, आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात आशा कर्मचार्‍यांना स्वतंत्र कक्ष द्यावा, वाहनभत्ता तसेच विमा योजनेचा लाभ द्यावा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायमस्वरुपी राबवा, अशा मागण्या करण्यात आल्या.

मोर्चात अर्चना गडाख, छाया खैरनार, दीपाली कदम, मनिषा खैरनार, स्नेहल उगले, सुरेखा खैरनार, सुनंदा परदेशी, यमुना पवार, स्नेहल उगले, हिरा सजन, बेबी धात्रक, वैशाली गवळी, धनश्री भगत, अनंता खताळे, अर्पणा नेरकर, सुषमा वटारे, सुजाता जोगदड, कविता सोनवणे, मनिषा त्रिभुवन, कांता ठाकरे, शीतल रहाडे यांच्यासह हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

*