Type to search

तीन लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त, दोघांना अटक

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तीन लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त, दोघांना अटक

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरून त्यांच्या नंबर प्लेट बदलून कमी किंमतीत विक्री करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. त्यांच्याकडून 3 लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

नरेंद्र रवि वाघ ( 19, रा. टेलिफोन कॉलनी, भवानी नगर, दिंडोरी), हेमंत उर्फ सन्नी दगडु शेळके ( 18, रा. कोकणगाव खुर्द, ता.दिंडोरी) अशी संशयितांची नोव आहेत. त्यांचे तीन साथीदार फारार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
स्थागुशाचे पथकास मिळालेल्या गुप्त माहिती नुसार काही संशयीत दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरिक्षक स्वप्निल नाईक, संदिप कहाळे, सहायक उपनिरिक्षक रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दिपक आहिरे, प्रकाश तुपलोंढे, जयवंत सुर्यवंशी, संजय गोसावी, वसंत खांडवी, अमोल घुगे , प्रविण सानप, संदिप लगड, भूषण रानडे, गोकुळ सांगळे यांच्या पथकाने पथकाने दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात सापळा रचला.

दरम्यान दोन संशयीत काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात येतांना दिसताच त्यांना स्थागुशाचे पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेले बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्र व लायसन्सबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलीस खाक्या दाखवताच ती दुचाकी ओझर विमानतळ रोड परिसरातुन चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

संशयित नरेंद्र वाघ व हेमंत शेळके यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे दिंडोरी येथील इतर 3 साथीदारांसह ओझर, पिंपळगाव, कळवण व नाशिक शहरातील म्हसरूळ, पंचवटी परिसरातुन वर्दळीच्या ठिकाणांवर पाळत ठेवुन मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या बजाज कपंनीच्या 5 पल्सर जप्त करण्यात आल्या आहेत.

केलेल्या चौकशीत ओझर, पिंपळगाव, कळवण, पंचवटी व म्हसरूळ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आलेले असुन अजुन काही मोटर सायकल मिळुन येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संशयितांवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित सराईत
दुचाकीच्या चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन ते शिर्डी पोलीस ठाण्याकडील दरोडाच्या तयारीसह आर्म अ‍ॅक्टचे गुन्हयात फरार होते, स्थागुशाचे पथकाने त्यांना दिंडोरी परिसरातुन ताब्यात घेवुन कारवाई केली असुन त्यांचे इतर साथीदारांचा पथक शोध घेत आहे. त्यांचेकडुन दुचाकी चोरीसह अजुन काही महत्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केूली असुन त्या अनुषगांने त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

आदिवासी पाड्यांवर कमी भावात विक्री
पकडलेली टोळी चोरून आणलेल्या मोटर सायकल बनावट नंबरप्लेट लावुन कमी किंमतीचे भावात सुरगाणा, पेठ, हरसुल, दिंडोरी परिसरातील आदिवासी पाडयांमध्ये विक्री करत असल्याचे निपन्न झाले आहे. परंतु अशा दुचाकी खरेदी करणारांवरही गुन्हे दाखल केले जात असल्याने नागरीकांनी अशा कागदपत्रांशिवाय कमी किंतीत मिळणार्‍या दुचाकी खरेदी करून नयेत असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!