आता नाशिकमधील २६४ सोसायट्यांचे चेअरमन ‘विशेष पोलीस अधिकारी’

jalgaon-digital
2 Min Read

घराबाहेर पडणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून नवी शक्कल

नाशिक । प्रतिनिधी

करोनचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाँकडाऊन असतानाही घराबाहेर पडणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सोसायटीचे चेअरमन व सचिव यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणुन अधिकार दिले आहेत. शहरात आता पर्यंत २६४ जणांना हे अधिकार देण्यात आले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असली तरी अत्यावश्यक साहित्य, वस्तु घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. विशेषत: भाजीपाला घेणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे.

आपल्या सोसायटीतील कुटुंबांची लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस एका कुटुंबातील एक सदस्य घराबाहेर पडेल, अशी खातरजमा करण्याची जबाबदारी पोलिसांनी चेअरमनसह इतर पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. आतापर्यंत शहरातील २६४ सोसायटीचे चेअरमन व सचिवांचा सामावेश आहे.

यात परिमंडळ १ मध्ये ६९ तर परिमंडळ २ मधील १९५ सोसायटी आहेत. अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दररोज घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. विशेषत: भाजीपाला आणि औषधे ही एकावेळी घेऊन ठेवता येऊ शकते.

चेअरमनसह पदाधिकाऱ्यांनी आखलेल्या नियोजनासह सदस्यांनी सहकार्य करणे अपेक्षीत आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी विविध सोसायटींमध्ये पब्लीक अॅड्रेस सिस्टिमद्वारे जनजागृती केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खरेदीसाठी सातत्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्याची जबाबदारी सोसायटीच्या चेअरमन तसेच सचिवांकडे सोपविली आहे. यासाठी त्यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणुन अधिकार देण्यात आले आहेत. त्याचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे.  त्यांच्या सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे.

– अमोल तांबे, पोलीस उपायुक्त

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *