जिल्ह्यात 218 नव्या मतदान केंद्रांना मान्यता

सुसूत्रीकरणावर भर, जिल्ह्यात आता 4446 केंद्र

0

नाशिक । जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या फेररचनेत 218 नवीन मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता 4 हजार 446 वर पोहोचणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. तर दुसर्‍या टप्प्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरी भागातील मतदान केंद्रासाठी 1400 तर ग्रामीण भागातील केंद्रासाठी 1200 मतदारांची मर्यादा ठरवून देण्यात आली. या मर्यादेपेक्षा अधिकचे मतदार असल्यास नवीन केंद्र निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

निवडणूक शाखेने जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांतील 4 हजार 228 मतदान केंद्रांचे सर्वेक्षण केले. यात मर्यादेपेक्षा काही ठिकाणी मतदारांची संख्या जास्त असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यानुसार प्रशासनाने संबंधित केंद्रांची पुनर्रचना केली. या पुनर्रचनेत तब्बल 218 मतदान केंद्रांची नव्याने भर पडली आहे. तर 140 मतदान केंद्रांची जागा हलवण्यात आली. तसेच इगतपुरी मतदारसंघातील 15 केंद्रांची नावे बदलण्यात आली. दरम्यान, 701 केंद्रांवरील अधिकचे मतदार हे दुसर्‍या केंद्रावर पाठवण्यात आले असून जेथे मतदार संख्या कमी आहे, अशी केंद्रे नजीकच्या दुसर्‍या केंद्राला जोडण्यात आली.

मतदान केंद्र पुनर्रचनेत चांदवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 नव्या मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्याखालोखाल सिन्नरमध्ये 28 तर येवल्यात 24 केंद्रे वाढली आहेत. नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ मिळून 30 नवे केंद्रे उदयास आली आहेत. पुनर्रचनेत 220 मतदान केंद्रे वाढल्याने राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे.

नवी मतदान केंद्रे अशी
नांदगाव : 10, मालेगाव मध्य : 05, मालेगाव बाह्य : 09, बागलाण : 17, कळवण सुरगाणा : 15, चांदवड देवळा : 33, येवला : 24, सिन्नर : 28, निफाड : 08, दिंडोरी पेठ : 19, नाशिक पूर्व : 04, नाशिक मध्य : 06, नाशिक पश्चिम : 12, देवळाली : 08, इगतपुरी : 20

LEAVE A REPLY

*