Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरात रिक्षा २१ हजार; थांबे दिडशेच

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहरात रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत 21 हजारपेक्षा अधिक झाली आहे. तर रिक्षांसाठी असेलेले अधिकृत थांबे केवळ 148 आहेत. 213 थांब्यांचे नव्याने सर्वेक्षण झाले असले तरी त्यांना मान्यता कोणी द्यायची यावरून आदेशाचे घोंगडे भिजत पडले आहे. यामुळे रिक्षाचालकांनी अनाधिकृतपणे जिथे जागा मिळेल तेथे रिक्षा थांबे थाटले आहेत. परिणामी शहरातील वाहतुकीचा दरारोज बट्टयाभोळ सुरू आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकृत माहितीनुसार शहरात 15 हजार रिक्षांची नोंदणी आहे. मात्र प्रत्यक्षात शहरात 21 हजार पेक्षाही अधिक रिक्षा धावत असल्याचे वास्तव आहे. काही वर्षांपुर्वी महानगर पालिकेने शहरातील विविध महत्वाचे चौक, बसथांबे, रेल्वे स्टेशन अशा परिसरात मिळून रिक्षांसाठी अधिकृत 148 थांबे दिले होते.

यामध्ये एका थांब्यावर जास्तीत जास्त 5 ते 10 रिक्षांना मान्यता देण्यात आली होती. परंतु वेगाने वाढणार्‍या शहराप्रमाणेच रिक्षांची संख्याही वाढत गेली. परिणामी रिक्षा थांबे अपुरे पडू लागल्याने रिक्षा थांब्यांवर अनाधिकृतपणे एका एका थांब्यावर 15 ते 25 रिक्षा थांबल्या जात आहेत. तर शहरातील हजारो ठिकाणी रिक्षा थांब्यांना मान्यता नसताना युनीयनच्या नावाखाली फलक उभारून अनाधिकृत रिक्षा थांबे सुरू करण्यात आले आहेत.

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सर्वच चौकात चारही बाजुंनी अनाधिकृत रिक्षा थांबे तयार झाले आहेत. रिक्षा एका ओळीऐवजी दोन ओळीत उभ्या केल्या जातात. परिणामी चौकातीलच अर्धा रस्ता रिक्षांनी व्यापल्याने वाहतुक कोंडींला वारंवार तोंड द्यावे लागत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!