कालिका मंदिर राहणार दर्शनासाठी 24 तास खुले

0

प्राचीन काळापासून वसलेल्या नाशिक नगरीची ग्रामदेवता म्हणून कालिका देवीला मान आहे. मुंबई नाका परिसरात असलेले हे जगदंबेचे स्थान जागृत आणि नवसाला पावणारे म्हणूनही भाविकांमध्ये विख्यात आहे. अहिल्याबाई होळकरांच्या काळात या मंदिराचे महत्व वाढीला लागले.  यंदा प्रथमच चोवीस तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नियोजनाबाबत श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव (आण्णा) पाटील यांच्याशी साधलेला हा संवाद.

ऑनलाईन दर्शन सेवा
यंदाच्यावर्षी प्रथमच तिरूपती मंदिर , विठठल मंदिर , पंढरपूर, मुंबईतील सिध्दिविनायक मंदिर , शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर श्री कालिका देवी मंदिर संस्थानच्यावतीने देवीभक्तांसाठी खास ऑनलाईन दर्शनासाठी बुकिंगची व्यवस्था केली आहे. ही सेवा सशुल्क असणार आहे.

‘ओम नमो’ अ‍ॅप व्दारे भाविक दर्शनासाठी बुकिंग करू शकता. बुकिंग करतांना आधार क्रमांकही आवश्यक राहील. दर्शनासाठी भाविक आल्यानंतर आधार क्रमांक पडताळणी केल्यानंतरच त्यांना दर्शनासाठी सोडले जाईल. याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याचा परिणाम इतर भाविकांच्या दर्शन रांगेवर होणार नाही याचीही विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

मंदिर 24 तास खुले राहणार
दरवर्षी कालिका मातेच्या दर्शनासाठी मोठया संख्येने भाविक येतात. मात्र रात्री मंदिर बंद असल्याने सकाळी मोठया प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होते . याकरीता आता मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. फक्त रात्री 1 ते 2 या वेळात वस्त्रालंकारासाठी गाभारा बंद करण्यात येईल. मंदिर परिसरात लावण्यात येणार्‍या स्क्रिनव्दारे भाविकांना लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे.

मंदिर परिसरात देवी भक्तांना देवीचे विनात्रासाने दर्शन करता यावे याकरीता स्त्री व पुरूष अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यातआली आली आहे. दर्शनासाठी पाच रांगा करण्यात आल्या आहेत. यात मधली रांग सुरक्षेकरीता मोकळी ठेवण्यात येणार आहे. यामुळे आपत्तीजन्य परिस्थितीत येथून मदत पोहचवणे शक्य होणार आहे. दिव्यांग वयस्कर भक्तांसाठी व्हीलचेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा वॉच
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्यावतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलीस , होमगार्ड , नागरी संरक्षण दल व्यतिरिक्त विश्वस्त मंडळाचे 200 स्वयंसेवक , 50 सुरक्षारक्षक , अनिरूध्द बापू अ‍ॅकेडमीचे स्वयंसेवक 24 तास कार्यरत असणार आहे.

या सर्व सुरक्षारक्षकांची भोजनाची व्यवस्था मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुमारे 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच भाविकांचा 2 कोटी रूपयांचा अपघाती विमा आणि 1 कोटी रूपयांचा दागिन्यांचा विमा काढण्यात आला आहे.

भक्तनिवासाचे लोकार्पण
कालिका मंदिर ट्रस्टच्यावतीने साकारण्यात आलेल्या 9 खोल्यांच्या भक्तनिवासाचे लोकार्पण पर्यटनमंत्री जयकुमार रावल , पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापनेच्या मुर्हुतावर होणार आहे. भाविकांना अगदी नाममात्र दरात येथे राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवरात्रीनंतर शहरात उपचारासाठी येणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी अगदी नाममात्र दरात हे भक्तनिवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच येथे भोजनाचीही व्यवस्था केली जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वैद्यकिय पथक तैनात
भाविकांसाठी वैद्यकिय पथकही तैनात करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मेडीकल कॉलेजतर्फे औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एक रूग्णवाहीकाही सज्ज ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने एक अग्निशामक विभागाचा बंब कार्यरत असेल.

पर्यावरणाविषयी करणार जागृती
उत्सवातून सामाजीक बांधिलकी जोपासतांना परिसरात पर्यावरणपुरक पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण जागृतीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. वाढत्या साथरोगाचे फैलाव लक्षात घेता परिसर स्वच्छतेसाठी परिसरात महीला बचत गटाच्या माध्यमातून स्वच्छता स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्यावतीने घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सेवेसाठी खजिनदार सुभाष तळाजिया , सचिव डॉ. प्रताप कोठावळे , विश्वस्त किशोर कोठावळे , आबा पवार , दत्ता पाटील , भैययासाहेब कोठावळे ,सतिश कोठावळे , सुरेंद्र कोठावळे , राम पवार , भरत पाटील , श्याम पाटील , मंगेश कोठावळे आदिं कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

*