भाजपा नगरसेवकांना अपात्र करुन दाखवाच

नंदुरबार । दि.26। प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार शहरातील नागरीकांची घरपट्टी माफ करण्याचा मागणी सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवकांनी केली. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकेच्या सभेचे खोटे फुटेज शिवसेनेच्या नेत्याने दाखवून दिशाभूल केली आहे.

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी भाजपा नगरसेवकांना अपात्र करून दाखवावे असे प्रतिआव्हान भाजपा नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी दिले असून भाजपाने ठरविले तर नगराध्यक्षा दोन महिन्यात घरी बसतील असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नंदुरबार नगरपालिकेच्या घरपट्टी संदर्भात नंदुरबार येथील हॉटेल हिरा एक्झिक्युटीवमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ.चौधरी म्हणाले, नंदुरबारच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांचा आदर आम्ही कालही करत होतो व आजही तेवढाच करतो.

मात्र लॉकडाऊन काळात नंदुरबार शहरातील जनतेची सहा महिन्याची घरपट्टी माफ व्हावी, यासाठी भाजपा नगरसेवकांनी निवेदन दिले होते. असे असतांना भाजपाच्या मागणीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घरपट्टी माफ करण्याचा ठराव झाला असतांना नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी भाजपा नगरसेवकांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला.

सहा महिन्याची घरपट्टी माफ झाल्याचे फलक लावल्याने त्यांनी फलक उतरवा नाही तर गुन्हे दाखल करू अशी जाहीर धमकी दिली. एका महिला नगराध्यक्षांना हे न शोभणारे होते. याबाबत दि.16 ऑक्टोंबर रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे फुटेज माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी न दाखवता ते दुसरेच फुटेज दाखविले.

नंदुरबार पालिकेवर काँग्रेसची सत्ता असतांना पालिके संदर्भात पत्रकार परिषद घेवून शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेचे नेते असतांना श्री.रघुवंशींनी कोणत्या नैतिकतेने पालिकेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत भाजपा नगरसेवकांना अपात्र करण्याची धमकी दिली. जनहिताचा विचार करून प्रश्न मांडणार्‍या भाजपा नगरसेवकांवर दडपशाही करून, धमकावून दहशत निर्माण करीत आहेत.

याबाबत भाजपातर्फे त्यांचा निषेध करतो. आतापर्यंत श्री.रघुवंशींचा विरोध करणार्‍यांवर असाच प्रकारे दडपशाही केली. विरोध करणार्‍यांवर हल्लेही करण्यात आले. खूनाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत, असा आरोपही भाजपा नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी पत्र परिषदेत सांगितले.

नंदुरबार सभेतले फुटेज खोटे

नंदुरबार नगरपालिकेच्या ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेचे फुटेज नागरीकांना दाखवा, घरपट्टी संदर्भात ठराव झाला आहे किंवा नाही, हे आव्हान भाजपा नगरसेवकांनी दिले. हे आव्हान माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना पेलता आले नाही. त्यांनी सरळ स्पष्ट पुराव्यासह उत्तर देण्याऐवजी महिला नगराध्यक्षांचा अवमान करण्याचा कांगावा करीत पत्रकार परिषदेत खोटे फुटेज दाखवून दिशाभूल केली.

तर नगराध्यक्षा घरी बसतील

नंदुरबार शहरातील नागरीकांच्या प्रश्नासाठी लढणार्‍या भाजपा नगरसेवकांना अपात्र करण्याची भाषा माजी आ.रघुवंशी यांनी केली. मात्र भाजपाने ठरविले तर दोन महिन्यात नगराध्यक्षा अपात्र ठरून घरी बसतील, असेही श्री.चौधरी यांनी सांगितले. भाजपा नगरसेवक नेहमीच लोकहिताची भुमिका मांडत असतात. लॉकडाऊनची भीषण स्थिती असतांना भाजपा नगरसेवक रस्त्यावर कार्य करीत असतांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी घरात बसून होते. सार्वजनिक संकटात स्वतःची जपणूक करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे.

रूग्णांना साधी अ‍ॅब्युलन्स पाहिजे असेल तर त्यांचा उंबरठा खेटावा लागतो. त्यामुळे लोकहिताची भुमिका कोण घेत हे लोकांना माहिती आहे, असेही ते म्हणाले.

नंदुरबार येथे सर्वसाधारण सभेतील फुटेज तद्दनखोटे दाखवून नागरीकांची दिशाभूल श्री.रघुवंशी करीत आहेत. पत्रकार परिषद घेवून जी रेकॉडींग दाखविली. त्यात भाजपा नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्याचे आणि घरपट्टी माफी विषयीचे रेकॉर्डींग नीट झालेले नाही.

हे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी स्वतः लेखी पत्रात कबुल केले आहे. असे असतांनाही श्री.रघुवंशी दिशाभूल करून लोकहिताचा विषयात राजकारण करीत आहेत. घरपट्टीमाफी हा लोकहिताचा प्रश्न आहे. त्याबाबत चंद्रकांत रघुवंशींनी राजकारण करू नये व श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.

सत्तेचा वापर स्वार्थासाठी

सत्ताधार्‍यांच्या मालकीची जमिन असेल तर त्याविषयी ठराव करू नये, असे कुठे कायदा आहे का? असा प्रश्न श्री.रघुवंशी यांनी केला. मग शहरातील अनेक लोक अनेक महिन्यांपासून त्यांची जमीन रहिवास क्षेत्रात समाविष्ट केली जावी अशी मागणी करत असतांना त्यांना ताटकळत ठेवून सर्वसाधारण सभेत आपल्या कुटूंबियांची जमिन रहिवास क्षेत्रात समाविष्ट केली जात आहे. शहरातील रस्त्याची दुरवस्था असतांना त्यांच्या कुटूंबियांच्या जमिनीच्या लेआऊट रस्ते मात्र व्यवस्थीत आणि तातडीने होतात. त्यामुळे नंदुरबार पालिकेचा सत्तेचा वापर चंद्रकांत रघुवंशी आपल्या कुटूंबियांचा स्वार्थासाठी करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

तीव्र आंदोलनाचा इशारा

नंदुरबार पालिकेतील नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी म्हणतात की, घरपट्टी माफ करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे असतांना छत्रपती शिवाजी नाटयमंदिर, इंदिरा संकुल, क्रीडा संकुल आदी नगरपालिकेच्य मालकीच्या इमारतींची थकीत घरपट्टी कशी माफ केली. यामुळे त्यांच्या पंटर लोकांना पोसण्याचा हा प्रकार आहे. पत्रकार परिषदेत श्री.रघुवंशी यांनी सांगितले की, नगरपालिका अधिनियमानुसार आम्हाला घरपट्टी माफीचा अधिकार नाही केवळ सुट देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नंदुरबार पालिकेने 10 टक्के घरपट्टी वसुल करून 90 टक्के घरपट्टी सुट द्या, स्वतःच्या बगलबच्चांचा लाभ देणारी भुमिका घेतात तसेच जनतेला लाभ देणारी भुमिका चंद्रकांत रघुवंशी यांनी घ्यावी. घरपट्टी संदर्भात एका महिन्यात निर्णय न झाल्यास भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ.चौधरी यांनी दिला आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार पालिकेवर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची सत्ता आहे. त्यात भाजपाचे नगरसेवक निवडून आल्याने एकछत्री अंमलबंजावणीला छेद झाला. जनतेच्या पैशांवर डल्ला मारणार्‍या भुमिगत गटारी, रस्ते, आदी कामांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपा नगरसेवकांना अपात्रतेचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा श्री.रघुवंशी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यात हिंम्मत असेल तर त्यांनी भाजपाच्या एकाही नगरसेवकास अपात्र करून दाखवावे असे आव्हान विजय चौधरी यांनी दिले. यावेळी विरोधी पक्षनेते चारूदत्त कळवणकर, निलेश माळी, आनंद माळी, गौरव चौधरी, प्रशांत चौधरी, आकाश चौधरी, कमल ठाकूर, संगिता सोनवणे आदी उपस्थित होते.