Type to search

नंदुरबार फिचर्स

बोट उलटून 13 जण बुडाले

Share

7 जणांचा मृत्यू, पाच जण बचावले

नंदुरबार

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या उच्छल येथे उकई धरणाच्या बॅकवॉटरमध्ये काल दि. 10 रोजी बोट उलटून 13 जण बुडाले. स्थानिक लोकांनी तसेच मासेमारी करणार्‍यांनी यातील पाच जणांचे प्राण वाचवले. तर राजेश कोकणी यांच्या कुटूंबातील चार सदस्यांचा यात मृत्यू झाला आहे. इतर तीन जणांचा घटनास्थळी बूडून मृत्यू झाला. मृतदेह पाण्यात बुडाल्याने पाणबुड्यांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.एक मृतदेह अद्यापही बेपत्ता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, होळीची सुटी असल्याने उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार उकई धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोटींग करण्यासाठी गेले होते. भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित झाली. त्यामुळे पाण्यात उलटली. यावेळी उपस्थित लोेकांनी आरडाओरड केल्याने गावाजवळील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारल्या. 13 पैकी सहा जणांना लोकांनी वाचवले. मात्र, अंधार पडल्याने बचाव कार्याला अडचणी आल्या.

पोलीस प्रशासन महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्नीशमन दलाची टिम घटनास्थळी रवाना झाली. सुंदरपूर नवापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. घटनेतील मयत हे सुंदरपूर गावातील असल्याने गावावर शोककळा पसरली. मृतांमध्ये नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

या अपघातात वाचविण्यात यश आलेले प्रवासी असे – विकास राजू गामित (वय 20, रा. वणझारी ता.उच्छ्ल), सुमित पारध्या गामित (वय 22, रा.भींतखुद ता.उच्छल), दिनेश देवाजी वळवी (वय 28, रा.वणझारी ता.उच्छल), जिग्नेश नारू कोकणी (वय 20, सुंदरपूर ता.उच्छल), याकुब भीमसिग कोकणी (वय 28, रा.सुंदरपूर) यांचा समावेश आहे.

मयतांमध्ये विनोद बुधिया कोकणी (वय 18), उर्मिला रतू कोकणी (वय 20), आराध्या सुकलाल कोकणी (वय 7), एंजल्स डेविड कोकणी (वय 5), अंजना राजेश कोकणी (वय 14), अभिषेक राजेश कोकणी (वय 12), राकेश बळीराम कोकणी (वय 32, रा सुंदरपूर ता.उच्छल जि.तापी) यांचा समावेश आहे. राकेश कोकणी हे भारतीय स्टेट बँकेत शिपाई म्हणून नोकरी करीत होते.
धुलीवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बुडालेल्या लोकांना वाचविण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!