उभद येथेही गुटख्याचे गोडावून-भल्या पहाटे होतेय कोटयावधीच्या उलाढाल

0
नंदुरबार । दि.31 । प्रतिनिधी-दररोज कोटयावधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या गुटख्याच्या पुडयांची विल्हेवाट भल्या पहाटे लावण्यात येत असून वाहतूकीसाठी गुजरात व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा सर्रासपणे वापर होतांना दिसत आहे.
दरम्यान, नंदुरबारातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या ‘त्या’ गुटखा किंगाचे प्रकाशा-तळोदा रस्त्यावर असलेल्या गुजरात राज्यातील उभद या गावाला भलेमोठे गोडावून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने काही वर्षापासून राज्यात गुटखा विक्रीस बंदी केली आहे. परंतू शेजारच्या गुजरात राज्यात गुटखा बंदी नाही. त्यामुळे गुजरात राज्यातून दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची नंदुरबारात विक्री होत आहे.

नंदुरबार शहरासह जिल्हयातील बहुतांश पानटपर्‍यांवर विमलच्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होत आहे. विशेष म्हणजे गुटख्याची विक्री ही दुप्पट, तिप्पट किमतीने होत आहे.

मात्र, गुटखा विक्रीबद्दल कोणतीही कारवाई केली जात नाही. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले तीन गुटखा किंग हे संपुर्ण जिल्हयाला गुटख्याचा पुरवठा करत आहेत.

नंदुरबार शहरापासून पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या निझर या गावी या गुटखा किंगांचे तीन ते चार मोठमोठे गोडावून आहेत. तसेच प्रकाशा-तळोदा रस्त्यावरील उभद या गुजरात राज्यातील गावातही या गुटखा किंगाचे मोठे गोडावून आहे.

या गोडावूनमध्ये कोटयावधी रुपयांचा विमल गुटख्याचा साठा आहे. तेथून दररोज रात्री 2 वाजेनंतर गुटख्याची ‘डिलीव्हरी’ सुरु होते. या दोन्ही गावांमधील गोडावूनमधून दररोज सुमारे एक कोटी रुपयांच्या गुटख्याची वाहतूक होत आहे.

विशेष म्हणजे कोटयावधी रुपयांची उलाढाल होत असूनही कागदोपत्री या गुटख्याची कुठलीही नोंद होतांना दिसत नाही. उभद येथील गोडावूनमधून पहाटे पहाटे गुटख्याचा माल वितरीत केला जातो.

या लहान टेम्पो, मोटरसायकल, अ‍ॅपेरिक्षा आदी वाहनांचा वापर केला जातो. पहाटे गुजरात व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही तळोदा-प्रकाशा, तसेच निझर-नंदुरबार रस्त्यावरुन धावत असतात.

या बसेसमध्ाूनही गुटख्याची वाहतूक केली जाते. गुटखा हा बंद खोक्यात असल्याने त्यात कोणता माल आहे हे वरुन समजत नाही. परंतू दररोज या वाहनांमधून कोटयावधी रुपयांची गुटखा तस्करी केली जात आहे.

मात्र, पोलीस प्रशासन आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचा वरदहस्त असल्यामुळे या गुटखा तस्करांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुटखा किंग हे शहरात ताठमानेने फिरतांना दिसतात.

याकडे पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी लक्ष देवून संबंधीत गुटखा तस्करांवर कारवाई करण्याची गरज आहे. या तस्करीत जी साखळी आहे तीलादेखील ‘ब्रेक’ लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

LEAVE A REPLY

*