नंदुरबारात वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन

0
नंदुरबार । दि.24 । प्रतिनिधी-वन तयार झाले नाही तर पृथ्वीचा नाश अटळ आहे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान एक झाड लावावे व जगवावे असे आवाहन आ.डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले.
सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपे आपल्या दारी या कार्यक्रमातंर्गत शहरवासीयांना सवलतीचा दरात वृक्ष रोपे पुरवठा करण्याचा दृष्टीने वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एस.आर.मोरे, सहाय्यक संचालक रामकिसन जेजुरकर, सहाय्यक वनसंरक्षक रणदिवे, लागवड अधिकारी मनोज सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी मोठया संख्येने शिक्षक विविध विद्यालयांचे विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचे येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे महाअभियान राबवण्याचे ठरवले असून यावर्षी 1 ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून ही जनतेची चळवळ व्हावी, असा शासनाचा उद्देश आहे.

त्यासाठी जनजागृती करण्याकरीता व नागरीक जनतेस सवलतीच्या दरात वृक्ष रोपे पुरवण्याकरता वृक्षदिंडी व वनमहोत्सव केंद्र दि.7 जुलैपर्यंत सुरू करण्यात आल्याचे यावेळी राकिसन जेजुकर यांनी प्रस्ताविकात सांगितले.

जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी जनतेने वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे यावे व जेवढी झाडे जगवता येतील त्या ठिकाणीच झाडे लावावेत व एक लोकचळवळ निर्माण करावी असे आवाहन केले.

जिल्ह्यात यावर्षी 10.59 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यावर्षी सुमारे त्याहीपेक्षा जास्त म्हणजे 14 लाख वृक्ष लागवड करणार असल्याचे व त्यासाठी प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या वनपट्टयावर लागवड होण्याच्या दृष्टीने लोकसमन्वय प्रतिष्ठानतर्फे सारख्या संस्थेचे सुमारे 4 लाख वृक्ष लागवडीचा वाटा उचलला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

आ.डॉ.विजयकुमार गावीत यांनी पर्यावरणासाठी व प्राणवायुसाठी झाडे ही एकमेव स्त्रोत आहे. वन तयार झाली नाही तर पृथ्वीचा नाश अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान एक झाड लावावे व जगवावे तसेच आपल्या कुटूबियांनाही झाड लावून जगवण्यास सांगावे असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही प्रजातीचे झाड लावा पण झाड जगवा असे आवाहन त्यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

*