तळोदा तालुक्यात दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड !

0
तळोदा । श.प्र.-तालुक्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसून गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसावर काही भागात खरीपाची पेरणी करण्यात आली आहे.
तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 130 हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. मात्र, 10-12 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीपाच्या उर्वरीत पेरण्या खोळंबल्या आहेत.
तळोदा शहर व तालुक्यात सिंचनाची सोय असलेले शेतकरी विक्रमी कापूस लागवड करीत असतात. मात्र, मागील वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानाने भूगर्भातील पाण्याची पातळीत कमालीची घट झाली आहे.
त्यामुळे कुपनलिकांसह विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या ऊस, केळी, पपई या पिकांना पाणी देणे जिकीरीचे झाले आहे.

तालुक्यात 15 मे नंतर होणारी बागायती कापसाची लागवडदेखील या कारणाने रखडली आहे. मृग नक्षत्रात 8 व 9 जून रोजी तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

दि.8 जूनपर्यंत सरासरी 16.5 व 9 रोजी सरासरी 13.5 मिमी पाऊस झाला. यामुळे बागायतदार क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांनी कापूस लागवड करण्यास प्रारंभ केला आहे.

तालुक्यात सुमारे 1130 हेक्टर कापसाची लागवड आतापर्यंत करण्यात आली आहे. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सोयाबीन, ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे.

मात्र, या दोन दिवसाच्या पावसानंतर पावसाने दडी मारल्याने काही भागातील खरीप पेरणी अद्याप खोळंबली आहे. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असून जून महिन्यात पाऊस येईल का नाही याबाबत साशंकतेचे वातावरण आहे.

तळोदा तालुक्यात कृषी विभागाला 2017-18 खरीप हंगामाचे सर्वसाधारण 17 हजार 520 हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट आहे. त्यात खरीप हंगाम पीकनिहाय सर्वसाधारण क्षेत्र असे आहे.

भात 1 हजार 254 हेक्टर, मका 3 हजार 397 हेक्टर, खरीप ज्वारी 2 हजार 887 हेक्टर, बाजरी 30 हेक्टर इतर तृणधान्य 162 हेक्टर, एकूण तृणधान्य 7 हजार 730 हेक्टर, मूग 534 हेक्टर, उडीद 381 हेक्टर, तूर 1 हजार 204 हेक्टर इतर कडधान्य 184 हेक्टर एकूण कडधान्य 2 हजार 234 हेक्टर, भुईमूग 35 हेक्टर, तीळ 11 हेक्टर, सूर्यफुल 137 हेक्टर, सोयाबीन 1 हजार 596 हेक्टर, सोयाबीन 1 हजार 596 हेक्टर, एरंडी 00 हेक्टर, इतर गळीत धान्य 74 हेक्टर, एकूण गळीत धान्य 1 हजार 853 हेक्टर कापूस 5 हजार 713 हेक्टर क्षेत्रापैकी 1 हजार 130 हेक्टर असून अद्याप सुमारे पाच ते सात टक्के पेरणी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कापूस लागवडीत घट
तळोदा तालुक्यात कापूस लागवड क्षेत्रात घट होणार आहे. गेल्यावर्षी कापसाचे दोन हजार 913 हेक्टर क्षेत्र लागवड होणार असा कृषी विभागाचा अंदाज होता. मात्र, तब्बल सात हजार 317 हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली होती.

यावर्षी पाच हजार 713 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र गृहीत धरले आहे. मात्र, यावर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असल्याने व अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने फक्त एक हजार 130 हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे.

पाऊस नसल्याने शेतकर्‍यांनी कापूस लागवड करणे टाळले आहे. पर्जन्यमान कमी, वीजेच्या समस्या, दरामधील तफावत, विविध रोगांचा प्रादुर्भाव, वाढता भांडवली खर्च यामुळे शेतकरी कापसाऐवजी अन्य पिकांकडे वळतांना दिसून येत आहेत.

 

LEAVE A REPLY

*