Type to search

नंदुरबार

टेंभा-शिरुड रस्त्यावर पडलेला बनावट दरोडा उघडकीस

Share
कापूस विकू दिला नाही पित्याचे दगडावर डोके आपटले, Ashvi Crime News Sangmner

शहादा | ता.प्र. – पाच ते सहा जणांनी गाडी अडवून डोळ्यात मिरची पावडर फेकून मारहाण करीत १ लाख २१ हजार रुपये जबरीने हिसकावून नेल्याची माहिती गाडी चालकाने त्याच्या मालकाद्वारे पोलिसांना कळविताच तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले. मात्र, घटनास्थळाच्या परिस्थितीवरून पोलिसांना ही घटना बनावट असल्याचा संशय आला. चालकाला पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसी खाक्या दाखविताच अवघ्या काही तासातच या घटनेचे सत्य उलगडले आणि चालकानेच हा बनावट दरोडा घडवून आणल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चालक अर्जून संतोष पाडवी याच्यासह त्याच्या सहा साथीदारांना गजाआड केले. ही घटना टेंभा-शिरुड रस्त्यावर दि.२२ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली होती.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील बालाजी वेफर्सचे मालक अमित मोतीलाल जैन यांच्याकडे टेम्पो (क्र.एम.एच.३९-८७१८) या वाहनावर अर्जुन संतोष पाडवी हा चालक म्हणून कार्यरत आहे. दि.२२ रोजी अर्जुन पाडवी टेंभा येथे वेफर्स पोचविण्यासाठी मदतनीस योगेश माळी यांच्यासह गेला होता. त्याच्याजवळ १ लाख २१ हजार रुपये रोख जमा झाले होते. ते घेऊन तो रात्री साडेआठ वाजता तालुक्यातील टेंभा-शिरुड रस्त्याने येत असताना पाच ते सहा जणांनी त्याचे वाहन अडवित वाहनाच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांना मारहाण केली. पाडवी याच्याजवळ असलेले १ लाख २१ हजार रुपये जबरीने हिसकावून नेत तेथून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या घटनेची पाडवी याने त्याचे मालक अमित जैन यास माहिती दिली. जैन यांनी तात्काळ पोलिसांना घटना कळविले असता पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोहेकॉ जलाल शेख, मनोज सरदार, विकास कापुरे, दीपक भोई, स्वप्नील गोसावी, महेंद्र ठाकूर, देवा गावित, दीपक फुलपगारे, नानाभाऊ ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परीसरात आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पसार झाले होते. पोलिसांना टेम्पो हा रस्त्याच्या बाजूस उभा असल्याचे दिसले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चालकाने सांगितलेली हकीकत व परिस्थितीजन्य पुरावे पाहून ही घटनाच बनावट असल्याचा संशय आला. त्यांनी चालक पाडवी यास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने हा बनावट दरोडा त्याच्या सहा साथीदारामार्फत घडवून आणल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्यांच्या सहा साथीदारांचा शोध घेत अवघ्या काही तासातच ज्ञानेश्वर झुलाल सोनवणे, विशाल मनोज पवार, राजू संजय पवार, सुनील इंदास ब्राह्मणे, दीपक छोटू पवार, सोमनाथ शंभू ठाकरे, यांना गजाआड केले. आरोपींकडून १ लाख ४ हजार ४८९ रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या बनावट दरोड्यात चालकच घटनेचा सूत्रधार निघाल्याचे उघड झाले आहे. अमित जैन यांच्या फिर्यादीवरून चालक अर्जुन पाडवी याच्यासह त्याच्या वरील सहा साथीदारांविरुद्ध कटकारस्थान रचणे, दरोडा घडवून आणणे, दिशाभूल करणे यासह भादंवि कलम ४०८, ३४, १२० ब, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहे सादिक शेख करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!