दंगेखोरांना अटक करण्याचे पोलिसांपुढे आव्हान !

0
शहादा । ता.प्र.-येथील गरीब नवाज कॉलनीत झालेली लुटमार, घरे व दुकानांची जाळपोळ तसेच शासकीय वाहनांचे नुकसान करून पोलीसांवर हल्ला करून दहशतीचे वातावरण पसरविणार्‍या दंगेखोरांना अटक करण्याचे आव्हान पोलीसांसमोर असून कारवाईच्या भितीपोटी अनेक संशयित शहरातून पसार झाले आहेत.
दरम्यान, अनेक संशयित शहरातच फिरत असतांनाही पोलीसांची कारवाई थंडावत चालल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
14 जून रोजी शहरातील गरीब नवाज कॉलनीत टँकरवरून पाणी भरण्याच्या वादातून माजी नगरसेवक मेहमुद शेख व नगरसेविका पुत्र मुज्जफ्फर अली (मुज्जु) या दोन गटात झालेल्या हाणामारीचे पर्यावसान नगरसेवक तेली याच्या खूनात झाले.

त्यानंतर उसळलेल्या दंगलीत शेख परिवारातील सदस्यांची व अध्यक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांच्या घरातील सामानांची लुटमार करून घरे व चारचाकी जाळण्यात आली.

घरे जाळण्यापूर्वी दंगलखोरांनी घरांमधील सामानांची लुटमार करण्यासह अनेक दुकानांनाही लक्ष्य केले. दंगलखोरांनी केलेल्या जाळपोळीत जवळपास 17 घरे, चार दुकाने, एक स्विफ्ट डिझायर कार, एक तवेरा कार, दोन ट्रॅक्टर, पाच मोटरसायकली व अल्युमिनीयम सेक्शनचे एक दुकान आगीत भस्मसात केले. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

प्रक्षुब्ध जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचाही वापर केला होता. मात्र, दंगलखोरांच्या दगडफेकीत पोलीस अधिक्षक महारू पाटील, उपनिरीक्षक अमृत पाटील यांच्यासह तीन पोलीस जखमी झाले.

पोलीसांच्या दोन वाहनांचेही नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून दंगलखोरांविरूद्ध 395, 307, 353 अन्वये 42 मुख्य आरोपींसह 300 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी संशयित दंगलखोरांविरोधात अटकसत्र सुरू केल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

ज्या संशयित दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल झाले आहेत. त्यातील अनेक जण बाहेरगावचे असल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र, काही संशयित शहाद्यातीलच असल्याने पोलीस कारवाईच्या भितीपोटी शहरातून गायब झाले असल्याची माहितीही पुढे येत आहे.

परंतु काही संशयित आरोपी अजूनही शहाद्यात मोकाट फिरत असल्याची माहितीही पुढे येत आहे. पोलीसांची अटकेची कारवाई तीन दिवसांपासून थंडावल्याने काही आरोपी मोकाट फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलीसांपुढे असल्याने कुठल्याही दबावापोटी पोलीसांनी अटकेची कारवाई सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

*