गणोर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन जखमी

0
म्हसावद । वार्ताहर- शहादा तालुक्यातील गणोर शिवारात बिबट्याने स्थानिक शेतकर्‍यांवर दोनदा हल्ला करून तीन लोकांना जखमी केले आहे. जखमींना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नंदुरबारला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, अंबापूर गणोर शिवारात एक ते दीड महिन्यापासून बिबट्याची दहशत आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील आडगाव येथील कैलास रायसिंग ठाकरे (40) हे आज शेतात शेळ्या चारत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मात्र प्रतिरोध केल्याने ते बिबटयाच्या तावडीतून सुटले. त्यांनी गावात येऊन घडलेली हकिकत सांगितल्याने गावातील लोक लाठयाकाठया घेऊन शेतात बिबट्याच्या शोधार्थ गेले. यावेळी 10.30 वाजेच्या बिबट्याने दिलवरसिंग बजरंग निकम (34) रा.गणोर, अनिल विजय रावतळे (21) रा.आडगाव यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. वन विभागाने त्वरित तीनही जखमींना मसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉ.अल्लाउद्दीन शेख यांनी औषधोपचार करून नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान ऊस तोड हंगाम संपला आहे. तेथे अर्धा एकर ऊसात बिबट्याने हल्ला केल्याने उसाचे क्षेत्र जाळून टाकण्यात आले आहे. सद्यस्थितीत बन्सीलाल सजन भामरे रा.गणोर यांच्या गव्हाच्या शेतात बिबट्याने आश्रय घेतला आहे.

त्या भागात दोन पिंजरे, पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दिवसा 25 कर्मचारी, रात्री 25 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक चौधरी यांनी भेट दिली असून वनक्षेत्रपाल घटनास्थळी तळ ठोकून आहेत. म्हसावद पोलिस स्टेशनचे पीआय धनराज, पोलीस कर्मचार्‍यांनी भेट देऊन पंचनामा केला. वनपाल थोरात, आर.जी.लामगे, वनरक्षक भदाणे व कर्मचारी यांनी बंदोबस्त लावला आहे.

विद्युत मंडळाने या भागात दिवसा वीजपुरवठा करावा, शेतकर्‍यांनी बिबट्यापासून बचावासाठी गटागटाने राहावे, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक एस आर चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*