शहाद्यात मांजा विक्रेत्यांची अचानक तपासणी

0
शहादा । ता.प्र.- नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी येथील पतंग विक्रेत्यांची अचानक तपासणी करण्यात आली. तहसीलदार मनोज खैरनार यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी राहूल वाघ, पोलीसउप निरीक्षक शिंदे पालिकेचे स्वच्छता निरीक्षक आर.एम.चव्हाण, मंडळ अधिकारी बी.ओ.पाटील यांच्या पथकाने तपासणी केली. तपासणीत तीन दुकानदाराकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

मकर संक्रांतीनिमित्त शहादा शहरातही पतंगोत्सव साजरा केला जात असतो. शहरात मोठ्या प्रमाणात विविध रंगीबेरंगी पतंगांची दुकाने आहेत. त्यातच राज्य शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याची तक्रार येथील महसूल प्रशासनाकडे काही सामाजिक संस्थांनी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर येथील महसूल यंत्रणेकडून शहराच्या मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांकडे व किरकोळ पतंग विक्रेते यांच्याकडे प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली असता तीन दुकानदारांकडे नायलॉन मांजा विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. साधारण 35 ते 40 दुकानांवर झाडाझडती केली असता बाकीच्या दुकानांवर नायलॉन मांजा दिसून आला नाही. ज्या तीन दुकानांवर नायलॉन मांजा मिळून आला त्यांना तहसीलदार मनोज खैरनार यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

पथकाने केलेल्या कारवाईमुळे पर्यावरण प्रेमीमध्ये समाधानकारक वातावरण आहे. नायलॉन मांज्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात त्याचप्रमाणे पशुपक्षी यांनादेखील इजा पोहचत असते. नायलॉन मांजावर विक्री असताना विक्रेत्यांनी विक्री करू नये अशी भावना पर्यावरण प्रेमी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*