लोणखेडा येथे चलनी नाणी-नोटांचे प्रदर्शन

0
शहादा । दि.27 । ता.प्र.-जगातील विविध देशांची दुर्मिळ चलनी नाणी, नोटा, सोन्याने घडविलेली टपाल तिकीटे, पाकीटे, सोन्याची नाणी, निसर्गाशी संबंधित चिन्हाची तिकीटे ऐतिहासिक व धार्मिकतेची साक्ष देणारी नाणी यांचे प्रदर्शन वनप्रेमी हैदरभाई नुरानी यांच्या लोणखेडा येथील निवासस्थानी भरविण्यात आले होते.
निमित्त होते पवित्र रमजान ईदचे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
रमजान ईदनिमित्त नुरानी यांनी शिरखुरमाचे आयोजन केले होते. त्याचे औचित्य साधून दीडशे वर्षापासूनच्या विविध देशातील दुर्मिळ चलनी नाणी व टपाल तिकीटे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, तहसिलदार मनोज खैरनार, नायब तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, युनूस बागवान आदी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत नुहभाई नुरानी व तैय्यब नुरानी यांनी केले. छंदवेडे 85 वर्षीय हैदरअली नुरानी यांचे सामाजिक पर्यावरण क्षेत्रातील कार्य सर्वश्रूत आहे.

1943 पासून त्यांना नाणे, टपाल तिकीटे देश विदेशातील चलन गोळा करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे स्वातंत्रपूर्व काळापासूनची विविध देशातील टपाल तिकीटे आहेत.

हैदराबादचा निजाम, इंदूरचे होळकर, म्हैसूरचा टिपु सुलतान, बहादुरशहा जफर यांच्या काळातील चलनी नाणी आहेत. निसर्गाशी संबंधित असलेल्या चिन्हाची तिकीटे आहेत.

यात भारतातील संगीतकार, सिनेकलावंत, जे.आर.डी. टाटा, मदर तेरेसा, धिरूभाई अंबानी यांच्यासह विविध प्राणी असलेले टपाल तिकीटे व पाकिटे आहेत.

विशेष म्हणजे अमेरिकेचे आतापर्यंत झालेले सर्वच राष्ट्रपतींचे गोल्डन कव्हरदेखील आहेत. सोबत देशांच्या दुर्मिळ चलनी नोटाही आहेत.

नुरानी यांच्याकडे किमान 70 देशातील चलनी नाणी आहेत. सोन्याची कवर असलेली टपाल तिकीटेही आहेत.

दुर्मिळ, ऐतिहासीक व धार्मिक बाबींच्या खजाना सर्वांना परिचीत व्हावा, म्हणून ईदचे औचित्य साधून हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

शिरखुरमाचा आस्वाद घेण्यापुर्वी येणार्‍या प्रत्येकाला या दुर्मिळ खजाना पाहण्याचा मोह आवरला जात नव्हता. हा दुर्मिळ खजाना पाहिल्यानंतर 85 वर्षीय हैदरभाईं नुरानी यांच्या छंदवेडया ध्येयाचे कौतुक केलयाशिवाय रहावले जात नव्हते आणि हा दुर्मिळ खजाना पाहून प्रत्येक जण अचंबित झाला.

LEAVE A REPLY

*