दंगल-दरोड्यातील आरोपीला ताब्यात घेवून सोडले

0
शहादा । दि.28 । ता.प्र.-दि.15 जून रोजी शहरातील गरीबनवाज परिसरात उसळलेल्या दंगलीत नगरसेवक रियाज कुरेशी यांच्या घरातील सामानाची लुटमार करीत संपूर्ण घर जाळून टाकण्यात आले होते.
याप्रकरणी संशयीत आरोपी साजिद रहिम पिंजारी यास काल दि.27 रोजी मुख्याधिकार्‍यांच्या दालनातून पोलीसांनी ताब्यात घेतले. मात्र, सायंकाळी जवाब घेवून सोडून दिल्याने शहादा पोलीसांविषयी उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान, अशाच गुन्ह्याखाली सात आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना वेगळा न्याय आणि पिंजारी यास वेगळा न्याय क? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.14 जून रोजी शहरात पाण्याच्या टँकरवरून झालेल्या धुमश्चक्रीतून एकाची हत्या झाल्याची घटना घडली होती.

ही घटना गरीब नवाज कॉलनी परिसरात मुस्लिम समाजातील दोन गटांमध्येच घडली होती. या हत्येप्रकरणाच्या घटनेनंतर खेतिया रोड परिसर व गरीबनवाज कॉलनी परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

शहरातील व्यवहारदेखील दोन दिवस बंद होते. ज्या व्यक्तीची हत्या झाली होती, त्याच्या समर्थकांनी, काही समाजकंटकांनी शहरात हैदोस घालत हत्या प्रकरणातील संशयितांची दुकाने व घरांची लुटमार करीत पेट्रोलबॉम्ब टाकून जाळून टाकली.

हा उद्रेक एवढ्यावरच न थांबता ज्यांचा या घटनेशी काहीएक संबंध नाही अशांनाही टार्गेट करण्यात आले होते. त्यातील नगरसेवक रियाज कुरेशी यांचा परिवार घरात असतांना समाजकंटकांनी दहशत निर्माण करीत त्यांच्या घरात घुसून चीजवस्तूंची लुटमार करून संपूर्ण घर जाळून टाकले.

या घटनेत कुरेशी यांच्या परिवाराने घाबरून पळ काढल्याने ते बचावले. त्यानंतर रियाज कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीसात 30 मुख्य आरोपींसह 100 ते 150 जणांविरोधात दंगलीचा व 395 अन्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीसांनीही 300 जणांविरूद्ध स्वतंत्रपणे गुन्हा दाखल केला आहे. काल दि.27 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी साजीद रहिम पिंजारी हा पालिका मुख्याधिकारी दालनात असल्याची कुणकुण पोलीसांना लागली.

सपोनी संतोष जाधव, पो.कॉ.जलाल शेख, जितू पाडवी, देवा गावीत, दादाभाई बुवा, संजय ठाकूर, आरसीपीचे विकास चौधरी, संदीप पावरा या पथकाने पोलिकेत धाव घेवून साजिद पिंजारी यास ताब्यात घेतले.

पोलीसांची ही कारवाई सुरू असतांना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीसांच्या कारवाईमुळे पिंजारी याची मोठी तारांबळ उडाली होती.

पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या साजिद पिंजारी याचा जाबजबाब नोंदवून अटक करण्याऐवजी त्यास सायंकाळी सोडून देण्यात आले. या घटनेमुळे शहरात पोलीसांच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

कारण, अशाच गुन्ह्यात महिनाभरापासून सात जणांना पोलीसांनी अटक केल्यानंतर अजूनही ते न्यायालयीन कस्टडीची हवा खात आहेत.

त्यांना वेगळा न्याय आणि याच गुन्ह्यातील पिंजारी यास वेगळा न्याय याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, अजूनही बरेच आरोपी शहरात मोकाट फिरत असतांनाही पोलीसांकडून कारवाई होत नसल्याने आरोपी डोईजड होण्याची शक्यता असल्याने पोलीसांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत एका गुन्ह्याच्या तपासासाठी राजस्थान येथे गेले असल्याने त्यांच्या पश्चात सदर कारवाई करण्यात आली आणि नंतर संशयितास सोडून देण्यात आल्याने ह्या कारवाईचा देखावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*