Type to search

Breaking News नंदुरबार

…आक्रोश…आक्रोश अन आक्रोश….

Share

नरेंद्र बागले
शहादा । औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 13 जण ठार तर 36 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शहादा येथील 9 जणांचा समावेश आहे. हृदय पिळवटून टाकणार्‍या या दुर्दैवी घटनेने अवघे शहादा शहर सुन्न झाले आहे.

जिकडे पहावे तिकडे या अपघाताचीच चर्चा सुरू होती. नुसती चर्चाच नव्हे तर डोळ्यातून अश्रूही वाट मोकळी होत होती. पाषाणाला पाझर फुटावा अशीही ही दुर्दैवी आणि तितकीच काळजाला छेद करणारी ही घटना होती. कारण या अपघातात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल नऊ जण शहादा शहरातील मयत झाले आहेत. या नऊ जणांमध्ये शहरालगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील शिरुड गावातील एकाचा समावेश आहे. या भीषण अपघातात कोणाची आई, कोणाची पत्नी, कोणाची बहीण, तर कोणाचा भाऊ तर कोणाचा मुलगा, काळाने हिरावून नेला आहे. काहींचा तर घरचा आधारस्तंभ गेला आहे. रात्री अपघाताची वार्ता जसजशी शहरात येत होती, तसतसा नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवाराचा काळजाचा ठोका चुकत होता. सकाळी शवविच्छेदन करून जसजसे सायरन वाजवत अ‍ॅम्बुलन्समधून मृतदेह येत होते, तसतसे वातावरण अधिकच शोकमग्न होत होते. मृतदेह घरी पोहोचताच नातेवाईक व आप्तस्वकीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मृतदेह पाहताच हंबरडा फोडणारे नातेवाईक पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही नकळत वाट करून देत होत्या. जिकडे पहावे तिकडे आक्रोश…आक्रोश…अन आक्रोशच.. दिसत होता.

आई-मुलगा आणि काकू-पुतण्याचा करुण अंत
प्रेरणा वंजारी व त्यांचा नववीत शिकणारा मुलगा सौरभ वंजारी या मायलेकांची सोबत निघालेली अंत्ययात्रा अन एक पिता व पतीच्या डोळ्यातून निघणार्‍या धारा बरेच काही सांगून जात होत्या. तसाच प्रकार शिक्षिका असलेल्या वृषाली भावसार यांच्या अंत्ययात्रेतही दिसून आला. त्यांच्या सोबत त्यांचा नववीत शिकणारा पुतण्या तेजस भावसार यालाही काळाने सोबत नेले होते. विद्यार्थीप्रिय असलेल्या या शिक्षिकेच्या अन तेजसच्या अंत्ययात्रेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून नकळत ओघळणारे अश्रू आणि नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा या दुर्दैवी घटनेची साक्ष देत होते. उच्चशिक्षित सीए झालेला सुयोग नाहटा या युवकाचा मृतदेह पाहताच त्याच्या परिवाराने फोडलेला टाहो मन हेलावून टाकणारा होता. अमरधाममध्ये एकाच वेळी सहा जणांचे अंत्यसंस्कार अन नातेवाईक परिवारातील सदस्य आणि समाजातील विविध घटकांसह हजारोंची उपस्थिती पाषाणालाही पाझर फोडणारी होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

रक्षाबंधन करून परत येत होता अन..!
अपघातातील मयत सुयोग बन्सीलाल नाहाटा (वय 23, रा.शहादा) हा येथील प्रसिद्ध व्यापारी बन्सीलाल नाहाटा यांचा तीन मुलींमागे एकुलता एक मुलगा होता. सीएचे शिक्षण घेत असतांना त्याने श्री किराणा नावाचे व्यापारी प्रतिष्ठान उघडले होते. नुकतीच ब्रिटानिया कंपनीची बिस्किटांची एजन्सी घेऊन आपला व्यवसाय थाटला होता. सुयोग हा दीक्षा घेतलेल्या नरडाणा येथील बहिणींचे दर्शन घेऊन श्रीरामपूरजवळील कुकाना या गावी असलेल्या आपल्या दुसर्‍या बहिणीकडून राखी बांधून घराकडे परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे त्याच्या तीन पैकी दोन बहिणींनी जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. आता परिवारात एक बहीण व एकुलता एक सुयोग होता. सुयोग हा अत्यंत मनमिळावू हसतमुख असल्याने सर्वांशी तो आपुलकीने वागत होता. धार्मिक परिवारातील सुयोगच्या जाण्याने कुटुंबासह सारेच शोकसागरात बुडाले आहेत.

काकू व पुतण्या वर काळाचा घाला
शहादा येथील भावसार कुटुंबातील जगदीश दत्तात्रय भावसार (वय 37), सुनिता जगदिश भावसार (वय 35), मुलगा तेजस जगदिश भावसार (वय 14) तिघेजण अमळनेर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रेल्वेने दोंडाईचा येथे उतरले. कुटुंबातीलच वृषाली दीपक भावसार (वय 35) याही नाशिक येथून आपल्या भावाकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून शहाद्याकडे येत होत्या. रस्त्यावर दोन्ही कुटुंबांचा भ्रमणध्वनीवरून एकमेकांशी संपर्क झाला. त्यात मयत वृषाली भावसार ज्या बसमध्ये बसल्या त्याच बसमध्ये कुटुंबातील तिघे जण दोंडाईचा येथून बसले. बसमध्ये वृषाली भावसार यांनी पुतण्या तेजसला आपल्याजवळ बसवले व अन्य दोघे जण मागच्या बाकावर बसले. अन अवघ्या काही वेळातच वृषाली भावसार व तेजस या काकू पुटण्यावर काळाने झडप घातली. त्या शहरातील व्हालंटरी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत होत्या. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. तसेच भावसार समाजाच्या महिला मंडळाच्या संचालक होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने विद्यार्थी सुन्न झाले आहेत. त्यांचे पती दीपक भावसार महावीर पतसंस्थेत नोकरीस आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा असून तो पुणे येथे ते इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तेजस हा याच शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्यात आई-वडील सुदैवाने वाचले मात्र मुलाचा दुर्दैवी अंत झाला.

सुतगिरणी कर्मचार्‍याचा मृत्यू
शिरूड (ता. शहादा) येथील संजय ताराचंद अलकरी यांचा जागीच मृत्यू झाला. ते उंटावद-होळ (शहादा)येथील जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीत स्पीड फ्रेम (में) या विभागात कर्मचारी म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक होते. इतर सहकार्‍यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. बस अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. सुतगिरणीतही अध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचार्‍यांनी सहवेदना जागवल्या. संजय अलंकरी यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!