शहादा-धडगाव रस्त्यावर अपघात; एक ठार

0
शहादा । ता.प्र.-शहादा-धडगांव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्‍या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एक तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना दरा गावालगत आज पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या युवकाच्या वाढदिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील जितेंद्र शांतीलाल मोरे (वय 27), धनंजय ज्ञानेश्वर लोहार, प्रविण दिलीप मराठे व जगदीश ज्ञानेश्वर लोहार हे चारही मित्र धडगांव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने होन्डा सिटी वाहन (क्र.एम.एच.39, ए-7877) या वाहनाने जात होते.

शहादा-धडगांव रस्त्यावर दरा गावाजवळ वाहन चालक जगदीश वाघ याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रस्त्याचा अंदाज चुकल्याने वाहन उलटून जवळच असलेल्या झोपडीजवळ येवून थांबली.

वाहनाने दोन-तीन पलटी मारल्याने वाहनामधील चौघे तरूण बाहेर फेकले गेले. यातील जितेंद्र शांतीलाल मोरे हा वाहनापासून बर्‍याच अंतरावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.

अन्य तिघे युवक गंभीर जखमी झाले. यातील प्रविण दिलीप मराठे याच्या डोक्यासही मार लागल्याने त्याला सुरत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाहनचालक जगदीश वाघ व धनंजय लोहार यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने झोपडीतील कोणालाही इजा झाली नाही. या अपघाताची नोंद म्हसावद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वाढदिवशीच काळाचा घाला!
अपघातात ठार झालेला जितेंद्र शांतीलाल मोरे (वय 27) हा युवक आई-वडिलांचा एकुलता एक होता. दि.25 जून रोजी त्याचा वाढदिवस होता. सायंकाळी घरी त्याच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा झाला होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास कुटुंबासोबत आनंदी वातावरणात रमला असतांना त्याच्या मित्रांनी घरी येवून त्यास धडगांव येथे कार्यक्रमास जाण्यासाठी आग्रह धरला. त्याचवेळी त्याने व आई-वडिलांनी त्या मित्रांना येण्यास नकार दिला. मात्र, आग्रहाखातर तो सोबत गेला आणि दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वाहनास अपघात होऊन जितेंद्र मोरे हा जागीच ठार झाला. अवघ्या काही तासातच होत्याचे नव्हते झाले अन् वाढदिवशीच क्रुर काळाने जितेंद्रवर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच त्याच्या परिवाराने हंबरडा फोडला. एकुलता एक मुलगा हरपल्याने त्याचा परिवार सुन्न झाला आहे. या घटनेने सर्वत्र दोन हळहळ व्यक्त होत आहे. सोमवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण पत्नी असा परिवार आहे. दीड वर्षापुर्वीच त्याचे लग्न झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल मोरे यांचा तो एकुलता एक चिरंजीव होता.

 

 

LEAVE A REPLY

*