कोट्यवधींचे रस्ते कागदावरच !

0
नंदुरबार । दि.22 । प्रतिनिधी-धडगाव तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठया प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून कोटीच्या कोटी रुपयांचे रस्ते कागदावर असल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व कामांची व ह्या रस्त्याची सखोल चौकशी व्हावी गरीब आदिवासी जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेतर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष गणेश पराडके यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पराडके यांनी म्हटले आहे की, धडगाव तालुक्यातील कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे काही वर्षांपासून चालू असलेल्या कामात दिसून आले.
जिल्ह्यातील अक्राणी या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या तालुक्यात नेहमी कुपोषण, आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे.

त्यामुळे राज्यात चर्चेत असणार्‍या तालुक्यात नर्मदा काठावरील गावे म्हटले की तेथील लोकांना कुठल्याच प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध नाही.

दर्‍याखोर्‍यात राहणार्‍या आदिवासी लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात व मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरु केली.

मात्र या योजनेला भ्रष्टाचाराने पोखरून टाकले आहे. सन 2007 ते 2008 या वर्षात प्रजिमा 11 ते कुंभरी 3.540 कि.मी. अंतराचा रास्ता कार्यकारी यंत्रणा जि.परिषद नंदुरबार यांच्या नियंत्रणाखाली बांधला गेला.

पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचा कालावधी असताना आतापर्यन्त या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.रास्ता तयार होऊन 9 वर्ष उलटून गेली तरी आतापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.

तरी रस्त्याच्या कामांची चौकशी होऊन रस्त्याचे डांबरी कारण चे काम पूर्ण करावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच गोरळी ते प्रजिमा 11 हा रस्ता 5.900 कि.मी.चा आहे.

या रस्त्याचे मातीकाम व खडीकरण झालेले आहे. मात्र 5.900 कि.मी.लांबीचा रस्ता असताना डांबरीकरण फक्त 3.100कि.मी. अंतराचे झाले आहे.

हे काम सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. रस्त्याला जे पूल बांधायचे होते त्यात फक्त स्लॅब ड्रेनचे काम झालेले आहे. एका मोठ्या पुलाचे अद्याप काम सुरु झालेले नाही.

सदर रस्त्याकरिता रक्कम 3 कोटी 38 लाख 6 हजार रक्कम मंजूर असताना गोराळी ते प्रजिमा 11 ह्या पुस्तकीच्या नोंदीनुसार रक्कम रु.3 कोटी 39 लाख 15 हजार 215 रुपये खर्च झालेला आहे. रस्ता 5.900 कि.मी. अंतराचा असताना 3.100कि.मी. अंतराचा डांबरीकरण करण्यात आले आहे. अंदाजित रक्कमेपेक्षा जास्त पैसे खर्च करून सुद्धा रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

प्रजिमा-11 ते कुंभरी हा रस्ता कार्यकारी यंत्रणा जिल्हा परिषद नंदुरबार यांनी केला आहे. गोराडी ते प्रजिमा -11 हा रस्ता रस्ते विकास महामंडळ नंदुरबार यांनी केला आहे.

मात्र गोराळी ते प्रजीमा -11 करताना प्रजिमा-11ते कुंभरी हा रस्ता सुद्धा त्याच कामात समाविष्ट केलेले दिसतो. प्रजिमा -11 ते कुंभरी रस्ता व गोरडी ते प्रजिमा -11 तसेच तालुक्यातील सर्व कामांची व ह्या रस्त्याची सखोल चौकशी व्हावी गरीब आदिवासी जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येऊन आमचे रस्ते पूर्ण करून द्यावे अन्यथा शिवसेनेतर्फे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*