तळोदा शहरातील रस्ते झाले सुंदर : अतिक्रमणाचे काय ?

0
चेतन इंगळे,मोदलपाडा ता.तळोदा । – तळोदा शहरातील रस्ते सुंदर होत आहेत, पण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाचे काय? असा सवाल शहरातील सुज्ञ नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील दुकानदार, व्यावसायिक, हातगाडीवाले यांनी या नव्या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले तर या नव्याने झालेल्या रस्त्यांचा काय उपयोग होणार ?
तळोदा शहरात सध्या विकास काम जोरात सुरु असून त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्त्याचे काम हे स्मारक चौक ते हातोडा रोडपर्यंत सुरु आहे व हा रस्ता अत्यंत चांगल्या दर्जाचा बनत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पण काही सुज्ञ नागरिकांकडून झालेल्या अतिक्रमणाविषयी वेगवेगळया प्रतिक्रीया उमटत आहे. या रस्त्याचे अर्धे काम पूर्ण झाले आहे व पूर्ण रस्ता झाल्यस त्याावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी पालिका प्रशासनाने घेतली आहे का?

घेतली नसेल तर हा रोड नविन बनवून काय उपयोग होईल? कारण पुन्हा वाहतुकिस अडथळे ठरणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी अतिक्रमणे ही सर्वात मोठी समस्या बनणार आहे.

पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी नव्याने पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवून शहरातील रस्ते व चौक मोकळे केले होते.

परंतु अतिक्रमण मोहिम पुन्हा थंडावल्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. आज तर पायी चालणेदेखील अडचणीचे ठरताना दिसून येत आहे.

सर्वात जास्त अतिक्रमण हे बसस्थानक, स्मारक चौक, मेन रोड या परिसरात होत आहे. शहराच्या विविध भागात उभे राहणारे अतिक्रमण मुख्याधिकार्‍यांसह शासकीय अधिकारी, प्रशासन, पोलिस उघड्या डोळयांनी हे दृश्य पाहत आहे, पण त्यावर कोणी कोणत्याच प्रकारची उपाययोजना करण्याची पाउले उचलतांना दिसून येत नाही.

मागील वर्षी पालिका प्रशासनाने लाखो रूपये खर्च करून अतिक्रमण मोहिम राबवली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

एकदा अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविल्यानंतर आपले कर्तव्य संपले या भावनेने पालिकेने नंतर याकडे दुर्लक्ष केले. या मोहिमेत सातत्य ठेवले असते तर आज एवढी वाईट परिस्थिती शहरात निर्माण झाली नसती.

आता तर नवीन रस्ते बनत आहेत. या भागात तरी अतिक्रमण होता कामा नये, कारण स्मारक चौक ते श्री स्वामी समर्थ केंद्र हा परिसर सर्वात जास्त वर्दळीचा व गजबजलेला असतो त्यातच जर अतिक्रमण झाले तर लोकांना चालणेदेखील फार जिकिरिचे होईल.

तळोदा शहरात अतिक्रमण हा पालिकेच्या व अतिक्रमण करणार्‍यांच्या दृष्टीने एक कधीही न संपणारा विषय आहे. पण हा विषय आता शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बनत चालला आहे.

शहरातील मेन रोड, स्मारक चौक,कॉलेज रोड, हुतात्मा चौक, बसस्थानक परिसर या भागात नेहमीच होणारी वाहतूकिची कोंडी याबाबी लक्षात घेत परिसरातील रहदारी सुरळीत होण्याच्या दृष्टीने संबंधितंनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे ठरते, अशीही भावना जनमानसातून व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील वाहने योग्य ठिकाणी उभी करण्यासाठी पार्किंग झोन तयार करणे, ठेलेवाले, लॉरीधारक व्यावसायिक यांनी रस्त्यावर उभे राहून व्यवसाय न करता त्यासाठी वेगळी व्यवस्था करणे या सर्व बाबींबद्दल पोलिस अधिकारी, दूकानदार व व्यावसायिक, सामजिक , सेवाभावी संस्थांचे प्रतिनधि यांची बैठक घेउन तसा प्रस्ताव मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी मागील मागील पोलिस निरीक्षक सतीश भामरे यांच्याकड़े पाठविण्यात आला होता.

पोलिसांमार्फत हा प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे सादर करण्यात आला होता.

शहरातील रस्ते आता सुंदर झाले असले तरी त्यात अतिक्रमणाची डोकेदुखी व्हायला नको व लॉरीवाले किवा व्यावसायिक यांना पर्यायी जागा आता पालिकेने उपलब्द्ध करून द्यावी, जेणे करून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवू पाहणार्‍या या समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*