रांझणी येथील ज्येष्ठांचा स्तुत्य उपक्रम

0
चिनोदा, ता.तळोदा । वार्ताहर-युवकांचा शेतीक्षेत्रात सहभाग वाढवा, यासाठी तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ज्येष्ठांनी भाडेपट्टयाने जमिन देण्याची पद्धत अवलंबली आहे.
याअंतर्गत गावठाणच्या मालकीच्या जमिन देण्यात आली आहे. तळोदा तालुक्यात हा पहिलाच प्रयत्न असल्याने सर्वस्तरातून त्याचे स्वागत होत आहे.
विठ्ठल मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथे गावठाणची तब्बल 14 एकर जमिन आहे. गावाला लागून असलेली ही जमिन गेल्या अनेक वर्षापासून पडून होती.

या जमिनीचा काहीतरी उपयोग व्हावा, अशी चर्चा गावात नेहमी होत होती. मात्र याबाबत ठोस असा काही निर्णय झाला नव्हता.

यावर तोडगा काढत गावातील माजी सैनिक श्रावणगीर गोसावी यांनी ग्रामस्थांना संघटीत करून युवा शेतकर्‍यांना ही जमिन वार्षिक कराराने भाडयाने देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची संकल्पना मांडली होती.

त्यानुसार गावातील विठ्ठल मंदिरात बैठक घेण्यात येऊन श्रावणगीर गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर चर्चा झाली.

यात सर्वप्रथम काशिनाथ भटा कदम, प्रल्हाद ओंकार भारती, शांताराम चिंधू मराठे, काशिनाथ कैलास भारती आणि जालमसिंग चांदू पाडवी यांची पंच म्हणून निवड करण्यात आली.

या बैठकीतच या जमिनीचा लिलाव करण्यात आला. या गावातील तरूण शेतकरी सोनू तारांचद पाडवी याने सर्वाधिक बोली लावल्याने त्यांना वर्षभरासाठी ही जमिन कसण्यासाठी देण्यात आली आहे.

14 एकर क्षेत्रात सोनू पाडवी याने कापूस आणि ज्वारी पेरणी करण्याचा मानसही याठिकाणी जाहिर केला. त्याला पंच आणि उपस्थित ग्रामस्थांनी संमती दिली.

लिलावातून आलेली रक्कमही बैठकीत बोलून दाखवली. तळोदा तालुक्यात गावठाणची जमिन युवा शेतकर्‍यांना देण्याच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

या उपक्रमाचे रांझणीत उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच रांझणी येथील हाया नंबरची जमिन प्रसिद्ध आहे. गावातील सर्वानीच या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले आहे.

येत्या काळातही या जमिनीचा वापर युवकांनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*