पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट

0
शहादा । दि.26 । ता.प्र.-कहाटुळ परीसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुन्हा पेरणीसाठी बी-बियाणे खरेदी करुन घेण्याचे संकट आले असून सध्या हातातली रक्कम बी-बियाणासाठी वापरली गेल्याने पुन्हा नवीन बी-बियाणे खरेदीसाठी पैश्यांची चणचण भेडसावत आहे. वरुणराजाच्या मेहरबानीसाठी देवाला साकडे घातले जात आहे.
शहादा तालुक्यातील कहाटूळ परीसरात 7 जून रोजी पाऊस झाला तसेच 8 व 9 जुनला देखील हलक्या सरी झाल्याने सतत 3 दिवस कमी जास्त का होईना पावसाळा सुरु झाला.

या समजुतीने जवळपास 10,11 व 12 जुनपर्यंत खरीपाचा कापुस, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका जवळपास 80 टक्के शेतकर्‍यांनी लागवड करुन टाकली.

मात्र, त्या लागवडीनंतर दि.25 अखेर पावसाने दडी मारल्याने कोवळया पिकास पाण्याची आवश्यकतेपुरता पाऊस न झाल्याने 50 टक्के लोकांनी लागवडीचे पिक पाण्याअभावी सुकुन गेल्यामुळे वखरणी करुन टाकली आहे.

सदरचा झालेला खर्च शेतकर्‍यांच्या डोक्यावर बसला असून पुन्हा गेल्या 2 दिवसात नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी भरपुर पाऊस झाला परंतु कहाटुळ शिवारात अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी राजा चांगल्या पर्जन्याची आतुरतेनेे वाट बघत आहे.

यानंतर चांगला पाऊस झाल्याशिवाय दुबार पेरणी होऊ शकत नाही म्हणुन शेती मशागतीचे नवीन कामे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 

LEAVE A REPLY

*