पावसाने पाठ फिरवल्याने चिनोदा परिसरात शेतकरी हवालदिल

0
चिनोदा । दि.12 । वार्ताहर-चिनोदासह परिसरात मान्सूनच्या आगमनाने शेतकर्‍यांमध्ये आनंद झाल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने शेतकर्‍यांची नजर आता आकाशाकडे लागल्या आहेत.
तळोदा तालुक्यातील चिनोदा परिसरात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे पेरणीसाठी व कापूस लागवडीसाठी शेतकर्‍यांनी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषि केंद्रावर गर्दी केली होती.
तसेच जाणकार शेतकर्‍यांच्या अंदाजानुसार मृग नक्षत्रात झालेला पाऊस हा शेवटपर्यंत टिकून राहतो. या आशेने कापूसह मूग, उडीद, ज्वारी, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केल्यानंतर सात ते आठ दिवस उलटले आहेत.
जो दिवस उगवतो तो ऊन,वारा वाहून निघून जात असल्यामुळे शेतकर्‍यांना आणखी एका मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

पाऊस लवकर न आल्यास दुबार पेरणीचे संकट येणार की काय या विवंचनेत शेतकरी कासावीस झाला आहे.

चिनोदासह नवागांव, रांझणी, प्रतापपूर, रोझवा परिसरातील बर्याच शेतकर्‍यांनी कापूस लागवड केलेली असून उर्वरित शेतकरी पेरणी करतांना दिसून येत आहेत.

दरम्यान परिसरात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यावर्षी वरूणराजाची आपल्यावर कृपादृष्टी झाली आहे.

या आशेने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गत काही वर्षापासून कमी पाऊस झाल्याने पाण्याची पातळीत घट झाली आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांची स्थिती हलाखीची झाली होती. मात्र यावर्षी वरूणराजाने मृग नक्षत्रातच पावसाच्या सरींनी सुरूवात करून आगमन केले. मात्र, तेव्हापासून दडी मारल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*