शहादा तालुक्यात समाधानकारक पाऊस, धरणांमध्ये मात्र ठणठणाट

0
शहादा । दि.26-तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस असला तरी धरणे, लघुप्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे.
पाणलोट क्षेत्रात येत्या महिनाभरात पाऊस न झाल्यास भविष्यात शहादा तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या आठवडयापासून शहरासह संपुर्ण तालुक्यात दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आले आहेत. तरीही परिसरातील अनेक धरणे व लघुप्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे.

कारण या धरण, लघुप्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. परिसरातील अनेक गाव, पाडयांना तसेच शहरी भागांना याच प्रकल्पांमधून किंवा धरणांमधून पाणीपुरवठा होतो.

परंतू त्यांच्यात जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाणीसाठा नसल्याने भविष्यात शहादा तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या महिनाभरात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला तरच या धरणांच्या पाणीसाठयात वाढ होणार आहे.
शहादा तालुक्यात यंदा विविध लघुप्रकल्प व मध्यम प्रकल्पांमधील गाळ काढण्याचे काम झाले आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वतः लक्ष घालून गाळ काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्यात काही लघुप्रकल्पांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने त्यात पाणीसाठा झाला आहे.

मात्र बहुतेक प्रकल्पांमध्ये अजूनही ठणठणाट आहे. येत्या महिनाभरात जोरदार पाऊस झाला नाही तर हे लघुप्रकल्प कोरडेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

शहादा शहरासह अनेक गावांना गोमाई नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या उन्हाळ्यात जवखेडा, टुकी, भागापूर, रायखेड, करजई, बुपकरी, तिखोरा, पिंगाणे आदी गोमाई नदीकाठावरील शेतकर्‍यांच्या शेकडो कुपनलिका बंद पडल्या आहेत.

या भागातील शेतकरी केळी, ऊस, पपई आदी पीके घेतात. या पिकांवर खर्चही भरपूर झाला आहे. मात्र या बागायती पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने विपरीत परिणाम होत असून शेतकर्‍यांच्या उत्पन्नात घट येणार आहे.

तालुक्यातील मध्यम व लघुप्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सद्यस्थितीत लोंढरे धरणात 0.0462, राणीपूर धरणात 0.9220, खापरखेडा 0.4230, कोंढावळ 0.4593, शहाणा धरणात 0.0246 टीएमसी पाणीसाठा आहे. तर उमराणी, लंगडी भवानी व दुधखेडा धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

 

LEAVE A REPLY

*