प्रकाशा येथे आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

0
प्रकाशा ता. शहादा । वार्ताहर- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व विविध शहर ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे उद्या दि.20 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळा होत असून, त्यात 16 जोडप्यांनी नोंदणी केली आहे.

प्रकाशा (ता. शहादा) येथे उद्या दि.20 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुजर समाज व विविध शहर ग्राम गुजर मंडळातर्फे 2017 पासून सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमात विवाह इच्छुकांकडून कुठलाही मोबदला न घेता विनामूल्य विवाह लावण्यात येतात. वधू- वरांसाठी आयोजकांकडून लग्नमंडप, सनई, चौघडे उपलब्ध करून देण्यात आले. सर्व नवरदेवांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीतून हा विवाह सोहळा केला जात आहे. प्रत्येक जोडप्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ केले जाते. स्वतंत्र पुरोहित दिले जात असल्याने सामुहिक विवाहातही स्वतंत्रपणे विवाह लावण्यात येतात. प्रकाशा येथील अन्नपूर्णा माता मंदिर परिसर, केदारेश्वर मंदिर व सद्गुरु धर्मशाळा परिसरात हा सोहळा होणार आहे. विवाह मुहूर्त 20 एप्रिलला सकाळी नऊ वाजून 57 मिनिटांचा असून सोहळा वेळेवरच होईल. यासोहळ्यासाठी दहा हजारोपक्षा अधिक समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. जिल्हाभरातील 16 जोडप्यांची नोंदणी या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी करण्यात आली आहे.

प्रत्येक जोडप्यासाठी क्रमांक देण्यात आला असून त्या क्रमांकाने व्यासपीठ व त्यासमोर संबंधितांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात विविध विषयांचे जनजागरण केले जाते. प्रामुख्याने पाणी बचतीचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व व स्त्रीजन्माचे स्वागत याबाबत जागर केला जातो. प्रत्येक नवदाम्पत्याची बिदाई वृक्षाचे रोप व संरक्षण जाळी देऊन केली जाणार आहे.सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी समित्या गठीत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*