Type to search

नंदुरबार राजकीय

नंदुरबार जिल्हयातील उमेदवारांना ‘दे धक्का’ ची धडकी

Share

राकेश कलाल
नंदुरबार । सतत तीन वेळा निवडून गेलेल्या आमदाराला पराभूत करण्यासाठी सन 2009 मध्ये मित्रपक्षाच्याच एका आमदाराने ‘दे धक्का’ तंत्राचा वापर केला होता. तेव्हापासून नंदुरबार जिल्हयातील राजकारणात ‘दे धक्का’ हे विशेषण प्रसिद्ध झाले आहेे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात काही नेत्यांनी आपल्या पक्षाला ‘हात’ दाखवून ‘जय महाराष्ट्र’ केले आहे. कोणी ‘हाता’त फुल घेतले आहे. कोणी आपल्या मनगटावरील ‘घडयाळ’ काढून ‘फुला’कडे आकर्षित झाले आहे तर कोणी फुलाची साथ सोडून हाताला प्रतिसाद दिला आहे. ही राजकीय उलथापालथ पाहता कालच पक्षात आलेले नेते खरोखर त्या त्या उमेदवारांना मनापासून मदत करतील की पुन्हा ‘दे धक्का’ तंत्राचा वापर होईल, अशी धडकी सध्या नंदुरबार जिल्हयातील चारही मतदार संघातील उमेदवारांमध्ये भरलेली दिसून येत आहे.

सन 2008 मध्ये महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट एवढा गाजला होता की त्याने काही महिन्यातच कोटयावधी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट पाहिला नसेल असे बोटावर मोजण्याएवढेच रसिक असतील.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभरानंतर सन 2009 मध्ये राज्यातील विधानसभा निवडणूका झाल्या. नंदुरबार जिल्हयातील चार विधानसभा मतदार संघापैकी एका मतदार संघात एक विद्यमान आमदार सलग तीन वेळा निवडून आले होते. चौथ्यांदा निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असतांनाच या आमदाराला पराभूत करण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षात असलेल्या एका आमदाराने ‘विडा’ उचलला होता. त्यामुळे या मित्रपक्षातील आमदाराने शहरातील मुख्य चौकात जाहीर सभा घेवून उघडउघड बंड पुकारत विद्यमान आमदाराला पराभूत करुन विरोधी पक्षातील महिला उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ‘दे धक्का’ तंत्राचा वापर केला होता. मात्र, हे धक्का तंत्र कुचकामी ठरले होते. मात्र, तेव्हापासून जिल्हयातील राजकारणात ‘दे धक्का’ हे विशेषण प्रसिद्ध झाले आहे.

दरम्यान, तब्बल 11 वर्षानंतर म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये ‘दे धक्का-2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकार जुनेच आहेत. त्याचे चित्रीकरण सुरु असतांनाच विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 2009 च्या निवडणूकीपर्यंत ‘दे धक्का’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ‘दे धक्का-2’ हा चित्रपट प्रदर्शित होवू घातला आहे. मात्र, तो निवडणूकीनंतर प्रदर्शित होणार आहे. परंतू हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच नंदुरबार जिल्हयातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये त्याची अनुभूती उमेदवारांना येवू लागली आहे. ज्याप्रमाणे ‘दे धक्का-2’ या चित्रपटातील कलाकार जुनेच आहेत, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूकीतदेखील बहुतांशी जुनेच उमेदवार आहेत.

जिल्हयात गेल्या दोन महिन्यापासून बहुतांश सर्वच राजकीय पक्षांतील मोठया नेत्यांनी वेगवेगळया पक्षांमध्ये पक्षांतर केल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी पक्षांतर केलेले दिसते. त्यामुळे काल दुसर्‍या पक्षातून टिका करणारा, उणेदुणे चव्हाटयावर आणणारा, जाहीर सभांमध्ये वस्त्रहरण करणारा नेता आज त्याच उमेदवाराचा प्रचार करतांना दिसत आहे. परंतू तरीही तो मनाने आपल्याजवळच आहे की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे तो आपल्याजवळ राहून दगाफटका तर करणार नाही ना? ‘मुँह मे राम बगल मे छुरी’ असला प्रकार तर घडणार नाही ना? 2009 मध्ये झालेल्या ‘दे धक्का’ ची पुनरावृत्ती ‘दे धक्का-2’ प्रमाणे होणार तर नाही ना, असे एक-ना-अनेक प्रश्न सध्या जिल्हयातील चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना सतावत आहेत. कारण जिल्हयातील चारही मतदार संघांमध्ये बहुरंगी लढती आहेत. काहींनी पक्षांतर करुन उमेदवारी मिळविली आहे. काहींनी मतदार संघ बदलले आहे. काही निष्ठवान त्याच पक्षात आहेत काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. काही ठिकाणी बंडखोरी नसली तरी छुपा पाठींबा विरोधी उमेदवारांना मिळेल काय? या विचारांनी सध्या सर्वच उमेदवारांना ‘दे धक्का’ ची धडकी भरलेली दिसत आहे. तरीही या उमेदवारांना त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!