काँग्रेसच्या उमेदवारीबाबत तिढा कायम

नंदुरबार जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढला

0
नंदुरबार । लोकसभा निवडणूक जाहीर झाली असूनही अद्याप काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत उमेदवारीत आघाडीवर असलेले आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना माणिकराव गावीत यांचे सुपूत्र असलेले भरत गावित यांनी उमेदवारीबाबत आव्हान उभे केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीबाबत तिढा कायम आहे.

देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दि.10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या निवडणुकांची तयारी गेल्या एक दीड वर्षापासून संभाव्य उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून सुरु होती. नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच सरळ लढत होणार आहे. भाजपाकडून विद्यमान खा.डॉ.हीना गावित यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यातच शिवसेनेसोबत भाजपाची युती झाल्यामुळे खा.गावितांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचीदेखील काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी गेल्या एक दीड वर्षापासून त्या दृष्टीने कामदेखील सुरु केले आहे.

परंतू गेल्या आठवडयापासून माणिकराव गावित यांचे सुपूत्र भरत गावित यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. माणिकराव गावीत हे तब्बल नऊ वेळा खासदार म्हणून यापुर्वी नंदुरबार लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची दिल्ली दरबारी चांगली प्रतिमा आहे. त्यांनी भरत गावित यांच्या उमेदवारीबाबत दिल्ली दरबारी गळ घातलेली दिसते. त्यामुळे उमेदवारीबाबत तिढा सुरुच आहे. काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे नंदुरबार व धुळे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*