Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबार जिल्हयात दमदार पाऊस, संपुर्ण जिल्हा जलमय

Share

नंदुरबार । नंदुरबारसह जिल्हाभरात काल रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने संपुर्ण जिल्हा जलयम झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तापमानातही प्रचंड उकाडा जाणवत होता. गेल्या आठवडयापासून पावसाचे फक्त वातावरण तयार होत होते. प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत होता. परंतू काल दि. 4 जुलैच्या रात्रीपासून जिल्हयातील तळोदा, शहादा, नवापूर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. आज दिवसभरही काही काळ वगळता पावसाची संततधार सुरुच आहे. नंदुरबार शहरासह जिल्हयात आज सकाळी 8 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरुच होती. रात्री 8 वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे संपुर्ण जिल्हा जलमय झाला असून काही नदीनाल्यांना पाणी आले आहे. तसेच पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या दमदार पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार असून शेतकरी राजा सुखावला आहे.

शहादा
शहादा येथे काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान पाऊस बंद होता. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरुच होती.

खेतिया-कोळदा रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे प्रकाशा रस्त्यावर वाहतूक ठप्प
कालपासून शहादा शहरात संततधार सुरू असून या संततधारेमुळे विद्यार्थी,शिक्षक,नोकरदार यांना शाळेत, ऑफिसला जाताना चांगलाच त्रास सहन करावा लागला. त्यातच खेतिया-कोळदा रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे प्रकाशा रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे झाले. रस्त्यात पूर्ण गार झाला आहे. दोन चाकी वाहने स्लिप होऊन पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच मोठमोठया वाहनांमुळे रस्त्यात खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनेही हेलकावे घेत चालतात. सकाळीदेखील पाऊस सुरूच होता. वाहने संथगतीने चालत होते. परंतु वाहकांना कोणाचे बंधन नसल्यामुळे बेशिस्तीने वाहन चालवत असल्याने रस्त्यात वाहतूक ठप्प झाली. त्यातच पाऊस सुरू व रस्त्यात पूर्ण गारा असल्याने वाहन पास होणे जिकरीचे झाले होते.रस्त्याचे काम अगदी धिम्यागतीने सुरू असून त्यातच कोणत्याच प्रकारचे बांधकामाचे नियोजन दिसून येत नाही आहे. प्रकाशा रोड हा पूर्ण गारामिश्रित झाल्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीत रस्त्याचे बांधकाम करणारे ठेकेदार व प्रशासन याने लक्ष घालणे गरजेचे आहे असे जनमानसात बोलले जात आहे.

तळोदा
सोमावल, ता.तळोदा । वार्ताहर – काल पडलेल्या मुसळधार पावसाने तळोदा शहरातील कॉलेज रोड व बाजारपेठेत पाणीच पाणी झाले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांना याचा फटका बसला. काही दुकानात पाणीही शिरले होते.

तळोदा परिसरात मुसळधार पाऊस झाला की शहराचा कॉलेज रोड पाचवीला पुजलेला असतो हे निश्चितच. काल पडलेल्या मुसळधार पाऊसही याला अपवाद ठरला नाही. नेहमीप्रमाणे कॉलेज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. या रस्त्यावरील व्यावसायिकांनी व रहिवाशांनी गटारीवर पक्के अतिक्रमण केले आहे. परिणामतः मुसळधार पावसात मुख्य बाजारपेठेत मोठया प्रमाणात पाणी साचत असते. या पावसातही असेच झाले. सकाळी हुतात्मा चौक ते स्मारक चौक या मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले तर काही दुकानांमध्येही पाणी शिरले. आठवडे बाजार असल्याने मात्र व्यापारी वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

शहरातील अतिक्रमण हा मुद्दा नेहमीच अत्यंत कळीचा राहिला आहे. अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. पावसाळ्यात मुख्य बाजारपेठत पाणी साचल्याची घटना कायमची झाली आहे. याकडे पालिकेने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी आहे. कॉलेज रस्त्यावरील गटारीवर व्यावसायिकांनी पक्के अतिक्रमण केल्यामुळे सफाई कामगारांना गटारीची साफसफाई करता येत नाही त्यामुळे गटारी पावसाळ्यात कुचकामी ठरत आहेत. त्यामुळेच शहरात मुसळधार पाऊस पडला की बाजारपेठे पुरसदृश्य परिस्थिती बनते. यावर पालिकेकडून कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वार्ड क्र 1 च्या राहिवाश्यानी जिल्हाधिकार्‍यांना भेटून गटारीची साफसफाई करण्यात येत नाही, अशी तक्रार केली होती . परंतु वार्ड क्र 1 कॉलेज रोड गटारीची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. त्यावरील पक्के अतिक्रमण कडे पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे . त्यामुळेच दरवर्षी पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी तुंबत आहे. आज आठवडे बाजार असल्याने लोणच्यासाठी कच्च्या कैर्‍यांची आवक मोठ्या प्रमाणात होती. सकाळी व्यासायिकांनी आपली दुकानी थाटली होती. परंतु अचानक बाजारपेठेत पाणी आल्याने पाण्यात कैर्‍या वाहिल्यात. त्यामुळे या दुकानदारांची एकच तारांबळ उडाली.
तळोदा तालुक्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळोदा-बोरद रस्त्यावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे बोरदकडे जाणारी व बोरदहुन तळोदा कडे येणार्‍या वाहतुकीवर परिणाम झाला. अवजड वाहनाची ये-जा बंद झाली. काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी मात्र प्रवाश्यांचे हाल झालेत.

नवापूर
नवापूर । प्रतिनिधी – गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळपासून जोरदार हजेरी लावली. शाळेच्या व कार्यालयाच्या वेळेस पाउस आल्याने शाळकरी विद्यार्थी व कर्मचार्‍यांना पावसात चांगलेच भिजावे लागले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील पावसात ओलेचिंब होऊन घरी जावे लागले. पावसाने वातावरण थंड तर झाले पण पिण्याच्या पाण्याचे काय? कारण आजदेखील चार दिवस होउनसुध्दा पाणी न मिळाल्याने नागरिक हताश झाले आहेत. गुरुवार सायंकाळी व शुक्रवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने गल्लोगल्ली रस्त्यावर खड्डे जलमय झाल्याने पाण्यात खड्डे का खड्ड्यात पाणी हे समजत नसल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागली. शहरात रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. पिण्याच्या पाण्याचीही मूलभूत गरज भागविण्यासाठी नागरिकांना इतिहासात प्रथमच वणवण भटकावे लागत असल्याने पालिका पाण्याचे नियोजन चुकल्याची चर्चा शहरात आहे.

मे महिन्यापासून पाणीटंचाईचा भीषण सामना नवापूरकर करत होते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर शहरात अखेर पावसाची दमदार सुरुवात झाली. सकाळी 10 वाजे पासून दुपारी 4 वाजे पर्यंत संततधार पावसाने नवापुरकर चांगलेच सुखावले. शाळेतील बाल गोपाल व विद्यार्थी चांगलाच आनंद लुटतांना दिसत होते. भाजीपाला मार्केटला पावसामुळे व्यापार्‍यांची चांगलीच दमछाक होताना दिसली. नवापुरकरांना मूलभूत गरजा तर सोडा विकासाच्या नावाखाली रस्ता निधीसाठी नेहमीच धावपळ करणार्‍या नगरसेवकाना चांगले रस्ते देण्यातही अपयशी ठरले असल्याची गावात चर्चा आहे. नियोजनाअभावी शहराच्या इतिहासात कधी नव्हे एवढी पाणीटंचाईचा सामना करावा लागला तर शहरातील प्रवेशद्वार असो की गल्लीतील रसत्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे. संपूर्ण शहरात रस्त्यातील खड्यामधे पहिल्याच पावसात पाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!