Type to search

नंदुरबार

…तर नागरिकांना अचूक नकाशा उपलब्ध! – चोक्कलिंगम

Share

नंदुरबार । ड्रोनद्वारे स्वातंत्र्योत्तर सर्वात मोठे सर्वेक्षणाचे काम राज्यात होत असून जिल्ह्यात होणार्‍या या सर्वेक्षणाद्वारे गावठाण हद्द निश्चित करुन गावठाणामधील रहिवाशांना अचूक नकाशा व सनद उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख एस. चोक्कलिंगम यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे ग्राम विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने करण्यात येणार्‍या नंदुरबार जिल्ह्यातील ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्प मोजणी कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसुमना पंत (नंदुरबार), अविनाश पंडा (तळोदा), निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपसंचालक भूमी अभिलेख मिलींद चव्हाण, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख महेश खडतरे आदी उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम म्हणाले, आतापर्यंत सर्व सर्वेक्षणे पारंपारिक पध्दतीने करण्यात आली आहेत. आता ते ड्रोनच्या सहाय्याने नव्या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे.  या सर्व्हेक्षणाद्वारे जनतेला त्यांचा हक्क अचूक कागदपत्रांद्वारे मिळणार आहे. या मोजणी कामामुळे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे मालमत्ता पत्रक तयार होईल, ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी कायदेशीर आधार असणारा अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. याद्वारे सर्व मालमत्ता या मालमत्ताकरांचे व्याप्तीत येतील आणि त्यामुळे ग्रामपंचायतींच्या महसूलात वाढ होईल, मालमत्ता नमुना-8 नोंदवही आपोआप तयार होईल. गावठाणाच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती व सार्वजनिक जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होतील.  परिणामी गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी प्रमाणात उद्भवतील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. भारुड म्हणाले, ड्रोनद्वारे गावठाण मोजणी प्रकल्प हा महत्वाकांशी व जनताभिमुख प्रकल्प आहे. हा प्रकल्प जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांनी त्यांचे कर्तव्य व त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदार्‍या योग्यरितीने पार पाडाव्यात.  सर्व्हेक्षणासाठी गट विकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर दर आठवड्याला आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.    कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!