Type to search

नंदुरबार

पिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी

Share

नंदुरबार । नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास व सहकारी मच्छिमार संस्थेच्या सहकार्याने सुरू झालेली पिंजरा पद्धत मासेमारीचा उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरून या भागातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आगामी काळात हा परिसर गेम फिशिंग आणि इको टुरिझमचा भाग होईल, असे प्रतिपादन नर्मदा सरोवर प्राधिकरणाचे महाराष्ट्र शासनाचे सल्लागार डॉ. अफरोज अहमद यांनी केले.

सरदार सरोवर प्रकल्पातर्गत पिंजर्‍यातील मत्स्य संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेण्याचा शुभारंभ खर्डी, ता.धडगाव येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सहसचिव श्यामसुंदर पाटील, मुख्य वनसंरक्षक अमित कळसकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद नाईक, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते.

डॉ.अहमद म्हणाले, नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांना वरदान ठरला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला 70 किलोमीटर चे बॅक वॉटर आले आहे. या पाण्याचा पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मत्स्य संशोधन केंद्राचे सहकार्य घेण्यात आले. नदीच्या पाण्यात मासे जीवंत राहणे म्हणजे पाणी शुद्ध असल्याचे निदर्शक आहे.

या प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍या आदिवासी बांधवांना 4200 हेक्टरचे जंगल उपलब्ध करून दिले. याशिवाय मूलभूत सोयी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आदिवासी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी राज्य शासनाचे महसूल, मदत व पुनवर्सन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.

आगामी काळात हा मत्स्य व्यवसाय प्रकल्प देशाला मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल. या भागांत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन आदिवासी बांधवानी करावे, असे आवाहन डॉ. अहमद यांनी केले.

नर्मदा नदीच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाची संधी उपलब्ध झाली असून या भागात कृषी महोत्सवाप्रमाणेच मत्स्य महोत्सव आयोजित करावेत, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. बगाटे यांनी केली. या भागाचा शाश्वत विकास आणि धूप थांबविण्यासाठी लोकसहभागातून उपक्रम हाती घेण्यात येतील, असे मुख्य वनसरंक्षक श्री. कळसकर म्हणाले.

सहसचिव श्री. पाटील यांनी हा उपक्रम अनुकरणीय असून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे सांगितले. मत्स्य शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. वर्तक यांनी सांगितले, कृषी विद्यापीठ व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा पहिलाच क्षेत्रीय प्रयोग यशस्वी झाला असून तो यापुढे ही शाश्वत पद्धतीने सुरू ठेवावा. हा प्रयोग आव्हानात्मक होता. मात्र, सांघिक कार्य केल्याने तो यशस्वी झाला. त्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यात तीन हजार पिंजरे देण्यात आले असून आगामी काळात मत्स्य विक्री साठी स्कुटी देण्याचा विचार असल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!