Type to search

नंदुरबार

वीज पडून ठार झालेल्या व्यक्तीचा लोकवर्गणीतून अंत्यविधी

Share

नरेंद्र बागले
शहादा । नैसर्गिक आपत्ती कोणावर कशी येईल आणि कोणाचा संसार कसा उघडयावर आणेल याची कल्पनाच न केलेली बरी. अशीच आपत्ती एका गरीब आदिवासी कुटुंबावर ओढवली आहे. अस्मानी संकटामुळे एका आदिवासी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला वीज पडून जीव गमवावा लागला. त्याचा अंत्यसंस्कार व उत्तरकार्य समाजबांधव तसेच गावकार्‍यांकडून लोकवर्गणीतून मिळालेल्या मदतीतून पार पाडण्याची अनोखी घटना शहादा तालुक्यातील शहाणे येथे घडली. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत अकस्मात मृत्यूमुखी झालेल्या मयताच्या वारसदारांना तत्काळ शासकीय आर्थिक मदत देण्याचे अधिकार तहसीलदारांना असतांना केवळ शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नसल्याने सदर कुटुंबीय अद्यापही शासकीय मदतीची वाट पाहत आहेत. त्यामुळे शासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा सर्वत्र निषेध व्यक केला जात आहे. याप्रकरणी दोषी व जबाबदार अधिकार्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून केली जात आहे.

‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ याची प्रचिती नागरिकांना अनेक ठिकाणी अनुभवायास मिळते. असाच अनुभव तालुक्यातील एका गरीब आदिवासी कुटुंबाला अनुभवास आला. अखेर माणुसकी या नात्याने आदिवासी कुटुंबाला मृत्यूपश्चात करावयाच्या उत्तरकार्याला अनेक हात पुढे सरसावले. गावकर्‍यांनी आर्थिक मदतिचा हात देत जातीरीतीरिवाजाप्रमाणे उत्तर कार्याच्या विधी पार पाडण्यास सहकार्य केले.

शहाणे (ता. शहादा) शिवारात शेतातील झोपडीत मयत तेरसिंग रुपला पावरा (वय 60) आपल्या परिवारासह राहत होते. दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक आभाळ भरुन आले आणि वीजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्याचवेळी तेरसिंग पावरा यांच्या झोपडीवर वीज पडली. त्यात ते गंभीर भाजल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य जखमींना नंदुरबार येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. घटनेचे वृत्त कळताच शासकीय अधिकारी नियमाप्रमाणे घटनास्थळी दाखल झाले. सर्व शासकीय सोपस्कार पार पाडला. परंतु कुटुंबाला अद्यापही मदतीची एक दमडीही न मिळाल्याने या गरीब आदिवासी कुटुंबावर मोठे संकटच् कोसळले. जाती रीतीरिवाजाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडणे आवश्यक होते. परंतु आर्थिक चणचण असल्याने करायचे काय या विवंचनेत कुटुंब होते. दरम्यान, मृताला शासकीय तातडीची मदत मिळायला हवी होती परंतु ती लालफितीत अडकल्याने गावकरी व डॉ.जितेंद्र तारासिंग भंडारी, नंदलाल तडवी, दिवाण सुळे, विकास भंडारी, इंदास पावरा, पद्माकर सुळे, चंपालाल सुळे आदीनी सर्व परिस्थिती समजून घेत कुटुंबाला आधार देत मदतीचा हात देतानाच दहा हजार रुपयांचा किराणा व सतरा हजार दोनशे रुपयांची आर्थिक मदत करीत उत्तर कार्याची सर्व सोपस्करही पार पाडले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!