Type to search

नंदुरबार

काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेला भाजपचे पाच वर्ष भारी – अमित शहा

Share

नंदुरबार । काँग्रेसने 70 वर्षात केला नाही एवढा विकास भाजप सरकारने पाच वर्षात केला. महाराष्ट्रात 46 हजार कोटींची कर्ज माफी केली आहे. तसेच विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी व ओबीसींना न्याय देण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. परंतू विरोधक सरकारचा अपप्रचार करत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

नवापूर येथील भाजपा उमेदवार भरत माणिकराव गावीत यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.शहा बोलत होते. व्यासपिठावर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, खा.डॉ हीना गावित, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, महायुतीचे उमेदवार भरत गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते. यावेळी शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसने केवळ मतांसाठी आदिवासींचा फायदा करून घेतला. केवळ विकासाचे आश्वासन दिले. मात्र, भाजपा सरकारने आदिवासी व ओबीसींना न्याय देण्याचे काम केले.

आदिवासी जनजाती कल्याण मंत्रालयाची स्थापना मोदी सरकारने केली. आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी खनिज क्षेत्र योजना सुरु केली. देशात काँग्रेस सरकारने 70 वर्षापासून लादलेले कलम 370 हटविण्याचे काम भाजपा सरकारने केले. या कलमाच्या माध्यमातून पाकीस्तान काश्मीरमध्ये आतंकवादाला चालना देत असे. काश्मिरी तरुणांच्या हाती हत्यारे देण्यात आली होती. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक जवान शहीद झाले आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी भाजप सरकारने कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. काश्मीर हा भारताचे अविभाज्य घटक आहे. देशाची सुरक्षा टिकून राहिली तरच विकासाला चालना मिळेल.

शरद पवारानी कधी गरिबी पाहिली नाही. नरेंद्र मोदी हे गरिबीतून वर आल्याने सामान्य जनतेच्या समस्यांची जाण त्यांना आहे. काँग्रेसने 70 वर्षात केला नाही एवढा विकास भाजप सरकारने पाच वर्षात केला. महाराष्ट्रात 46 हजार कोटींची कर्ज माफी केली. उपसा सिंचन योजना सुरु केल्या. आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात 1 लाख 27 हजार कोटी निधी दिला होता. मात्र मागील पाच वर्षाचा काळात भाजप सरकारने 4 लाख 38 हजार 760 कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासासाठी दिले आहेत. विकासाला चालना देणार्‍या सरकारच्या पाठीशी जनतेने उभे राहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी उमेदवार भरत गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!