Type to search

नंदुरबार

जिल्हयातील पिण्याच्या पाण्याच्या 8 हजार 644 स्त्रोतांची होणार तपासणी

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातर्फे जिल्हयातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या 8 हजार 644 स्त्रोतांची मान्सून पश्चात रासायनिक व जैविक तपासणी जिओफेन्सिग मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने केली जाणार आहे. त्यासाठी दि.15 ऑक्टोबर ते दि.31 डिसेंबर 2019 दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी दिली.

जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत विविध विभागाच्या समन्वयाने यासंबंधीची यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून दरवर्षी पिण्याचे शुध्द व निर्जंतुक पाणी ग्रामीण जनतेला मिळावे व दूषित पाण्यामुळे साथीचे आजार निर्माण होवू नये यासाठी दरवर्षी पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम आणि रासायानिक व जैविक तपासणी अभियान राबविले जाते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार नागपूर निर्मित जिओफेन्सिग मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांचे संकलन व जलस्त्रोतांची मॅपिंग ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसुरक्षक उपविभागीय जल-2 कर्मचार्‍यांमार्फत केली जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सुमारे 8 हजार 644 पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. या जलस्त्रोतांचे जिआयएस अ‍ॅसेट मॅपिंग देखील करण्यात आले आहे. दि.15 ऑक्टोबर ते दि.31 डिसेंबर 2019 या कालावधीत अक्कलकुवा,धडगाव,नंदुरबार, नवापूर या तालुक्यातील पाणी नमुन्यांची तपासणी संबंधीत तालुक्याच्या तर तळोदा व शहादा तालुक्याच्या पाणी नमुन्यांची तपासणी तळोदा स्थित भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या उपविभागीय प्रयोगशाळेत केली जाणार आहे.

तसेच या अभियानासोबतच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण दि.1 ऑक्टोबर ते दि.31 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविले जात आहे. त्यासाठीचे प्रपत्रा अ,ब,क निहाय प्राथामिक आरोग्य केंद्र स्तरावर स्त्रोतांचा परिसर,जलकुंभाची स्वच्छता योजनांमधील गळती, पाणी शुध्दीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येवून त्याआधारे जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणीकरिता निर्धारीत केलेल्या दिनांकापुर्वी आपल्या गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणीसाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक,जलसरक्षक व संबंधीत ग्रामपंचायतीच्या आरोग्य सेवकांनी संबंधीत प्रयोगशाळेत दिले गेले किंवा नाही याबाबतीत ग्रामस्थांनी खात्री करावी. तसेच ग्रामस्थांनी पिण्याचे शुध्द व निर्जंतुकीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाणी शुध्दीकरणसाठी नियमित टीसीएल पावडरचा व वैयक्तिक कुंटूब स्तरावर द्रव्य क्लोरीनचा वापर करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) डॉ.वर्षा फडोळ यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!