Type to search

नंदुरबार

दहीहंडी जल्लोषात

Share

नंदुरबार | जिल्हाभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात पार पडली. तरूणाईला वेध लागले होते ते दुसर्‍या दिवशी असलेल्या दहिहंडी उत्सवाचे. नंदुरबार शहरात २७ वर्षांपासून जयबजरंग व्यायाम शाळेतर्फे दहिहंडीची परंपरा सुरु आहे. यंदाही मोठया उत्साहात हा दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नऊ व्यायामशाळांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी ढोलताशांचा गजर करण्यात आला.

शहरातील सुभाष चौक परिसरात दहिहंडीचे तीन थर लावून श्री. सावता माळी व्यायामशाळा, गोविदांनी सलामी दिली व एकच जल्लोष झाला. जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र भर दहिहंडीचा उत्सव साजरा केला जातो. सळसळता उत्साह, धाडस, संस्कृती आणि खेळ या सगळयांचे एकत्रित रूप म्हणजे हा खेळ. गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असतांना सकाळपासूनच विविध व्यायाम शाळांचे गोविंदा पथके दहिहंडी फोडण्यासाठी बाहेर पडले. पावसाने पाठ फिरवली असतांनाही गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. विशेष म्हणजे शहरातील व्यायाम शाळांची संख्याही वाढली आहे. नंदुरबार येथे १९९२ सालापासून जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे दहिहंडीचे आयोजन करण्यात येते. सालाबादाप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस नंदुरबार शहर पालीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर व संजय भदाणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री.सावता माळी व्यायामशाळेने तीन थर रचून दहिहंडी फोडली. त्यानंतर शहरातील विर शैव लिंगायत गवळी व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, मा भगवती पुत्र व्यायाम शाळा, श्री शिबारी व्यायामशाळा, सार्वजनिक व्यायाम शाळा, जय संताजी व्यायाम शाळा, श्री वायुपुत्र व्यायाम शाळा, श्री रोकडेश्वर व्यायाम शाळा अशा नऊ व्यायाम शाळांच्या गोविंदा पथकांनी दहिहंडी फोडल्या.

शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात विविध व्यायाम शाळांनी लेझीम नृत्य सादर करत दहिहंडीचा ठिकाणी दाखल झाले. मोठया उत्साहात गोविंदा पथकांसह नागरीकांनी सहभाग नोंदविला. सुभाष चौकात दहिहंडी कार्यक्रमाच्यावेळी पूर्ण चौक नागरीकांनी भरून गेला होता. यावेळी दहिहंडी उत्सव पाहण्यासाठी खच्च भरला होता. शहरासह ग्रामीण भागातून दहिहंडी उत्सव पाहण्यासाठी आले होते. विविध व्यायाम शाळांनी रांगेप्रमाणे दहिहंडी फोडून शिस्तीने आपल्या व्यायाम शाळांकडे रवाना झाले. कार्यक्रमाचे आयोजन जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी शेखर मराठे, संजय भदाने, जितेंद्र मराठे, दिनेश कुंकारी,बलराज राजपूत यांनी परिश्रम घेतले. या व्यायाम शाळांना बक्षिस म्हणून ढाल देण्यात येणार आहे. पोलीस दलातर्फे यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!