Type to search

नंदुरबार

संरक्षण भिंत तोडण्यासाठी २० लाखांत ‘डिल’

Share

नंदुरबार |येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीची संरक्षण भिंत बेकायदेशीररीत्या तोडण्यासाठी महिलेसह चौघांशी २० लाख रुपयांची ‘डिल’ झाली. त्यानुसार सदर महिलेने उत्तर प्रदेशची खासदार असल्याचे भासवून तीन अंगरक्षकांना सोबत घेऊन दोन पिस्तुलांचा धाक दाखवत एस.टी. महामंडळाची संरक्षण भिंत बेकायदेशीररीत्या तोडली. मात्र, पोलिसांनी वेळीच दाखल होत संशयित आरोपींकडून २ पिस्तूल, २५ काडतुसांसह रोख ५ लाख ८५ हजार ७७० रुपये जप्त केले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तोतया महिला खासदारासह नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश बाबुलाल चौधरी (रा.चौधरी गल्ली, नंदुरबार) याने मुंबई येथील बबिता शर्मा व तिच्या तीन साथीदारांना राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीची साई प्लाझा कॉम्प्लेक्सजवळील संरक्षण भिंत बेकायदेशीरपणे पाडण्याचे काम २० लाख रुपयांत ठरवून कटकारस्थान रचले. त्यापैकी ५ लाख रुपये बबिता वर्मा हिला महिनाभरापूर्वी दिले होते. ठरल्याप्रमाणे बबिता वर्मा, विजय किसन देवरे, अजित चंद्रकांत देसले, वाल्मीक श्रीधर दराडे हे पांढर्‍या रंगाची महिंद्रा (यूव्ही-५००) कंपनीच्या (क्र.एमएच-०२/बीजी-७५१८) गाडीने दि.२३ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाले. त्यांनी नळवे येथील मजुरांना टिकाव, पहार, हातोडा आदी साहित्यासह सोबत बसस्थानकाजवळ आणलेे. काही मजूर बेकायदेशीरपणे भिंत तोडत असल्याचे आगार व्यवस्थापक मनोज रमेश पवार यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी विरोध केला असता, त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच आरोपी महिलेने मी उत्तर प्रदेशची खासदार, तर विजय देवरे याने पोलिस असल्याची बतावणी केली. त्यासोबत संरक्षण भिंत पाडण्याचा आदेश असल्याचे सांगत भिंत तोडून आगार व्यवस्थापकाची दिशाभूूल केली व त्यांना पैशांचे आमिष दाखविले. मात्र, आगार व्यवस्थापकांनी नकार दिला असता फिर्यादी, साक्षीदार व पोलिसांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करून आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी आगार व्यवस्थापक मनोज रमेश पवार (रा.कमलखेडा, ता.शिंदखेडा, धुळे) यांचनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश बाबुलाल चौधरी, बबिता वर्मा (रा.अंधेरी, मुंबई), विजय किसन देवरे (रा.खोरदड, ता.जि.धुळे), अजित चंद्रकांत देसले (रा.वलवाडी, जि.धुळे), वाल्मीक श्रीधर दराडे (रा.तिडके कॉलनी, नाशिक), जंगल कृष्णा पाडवी, दादू धनशा पाडवी, प्रकाश परसू पाडवी, जय बापू भील, रवींद्र विजय पाडवी (सर्व रा. नळवे खु., ता.नंदुरबार) यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून महिंद्रा कंपनीची कार, दोन पिस्तुले, एक अतिरिक्त मॅगझीन, २५ जिवंत काडतुसांसह ५ लाख ८५ हजार ७७० रुपये रोख, क्रेडिट कार्ड, इतर कार्ड व कागदपत्रे जप्त केली आहेत. आरोपी रमेश चौधरी हा फरार झाला असून, उर्वरित ९ जणांना अटक ककेली आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दि.२७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक किशोर नवले, शहर शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास नंदवाळकर करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!