Type to search

नंदुरबार

नंदुरबारात उद्या एकाचवेळी ७ हजार विद्यार्थी तयार करतील मातीचा गणपती

Share

नंदुरबार | पर्यावरणाचे संतुलन राखले जावे व मुर्तीचे पावित्र्य जपले जावे या उद्देशाने येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकाचवेळी ७ हजार विद्यार्थी मातीपासून गणपती तयार करणार आहेत. सदर गणपती विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून त्या माध्यमातून संकलीत होणारा निधी हा कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाठविला जाणार आहे. अध्यात्माबरोबरच पर्यावरणपूरक असा हा उपक्रम विश्‍वविक्रमी ठरणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख जीवन देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.देवरे म्हणाले, सध्या बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या असतात. या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्याचे पूर्ण विघटन होत नाही, परिणामी मूर्तीचे अवशेष पायदळी तुडवले जातात. आपण मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करून विसर्जन केले तर विसर्जनानंतर या मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळून जातात. अर्थात जलप्रदूषण होत नाही, म्हणून यावर्षी पासून सर्वांनी मातीच्या गणपती पूजनाचा आग्रह धरावा. यासाठीच हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात जिल्हाभरातील ५ हजार विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत ७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दि. २५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत हे सर्व विद्यार्थी एकाचवेळी मातीपासून गणपती तयार करतील. या प्रत्येक गणपतीच्या पोटात दोन बेलाच्या रोपाचे बिज रोपण करण्यात येणार आहे. या मातीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करण्याचा आग्रह राहणार आहे. त्यामुळे बेलाच्या बिजाला अंकुर फुटून त्यातून बेलाचे रोपही उगणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन बिजे देण्यात येणार असल्याने १४ हजार बेलाची रोपे तयार होणार आहेत. हा एकप्रकारे उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

मातीची गणेश मूर्ती खरेदी केल्याने गणपतीच्या सेवेसोबत पर्यावरण संवर्धनाचेसुद्धा कार्य होणार आहे. या गणेश मूर्तीच्या विक्रीतून जमा झालेल्या रक्कमेचा विनियोग परमपूज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेतील सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या कार्यासाठी करण्यात येणार आहे. सदर निधी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना प.पू.गुरुमाऊली यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, असेही श्री.देवरे यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!