Type to search

नंदुरबार

बसचे तिकीट काढण्याच्या 100 यंत्रांमध्ये बिघाड

Share

नंदुरबार। येथील आगारात बसमध्ये तिकीट काढण्याच्या 100 ईटीआयएम यंत्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने दिवसभर अनेक बसेस उशिरा धावल्या. मध्यरात्री 2 वाजेपासून यंत्रात व्यत्यय आल्यानेे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रवासी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना ईटीआयएम यंत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पूर्वी पत्र्याच्या पेटीतील तिकिटे काढून वाहक प्रवाशांना देण्यात येत होती. परंतु, त्यात सुधारणा होवून तसेच पारदर्शी कारभारासाठी महामंडळाने बसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी ईटीआयएम यंत्र उपलब्ध करून देण्यात आली.

नंदुरबार बसस्थानकात जवळपास 270 ईटीआयएम यंत्रांची सोय आहे. परंतु मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास यापैकी शंभर यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाल्याने गैरसोयींचा सामना करावा लागला. पहाटे पाच वाजेपासून बसचे चालक व वाहक नेहमीप्रमाणे कर्तव्यावर रुजू झाले. परंतु तिकीट काढण्याच्या ट्रायमेक्स यंत्रात बिघाड झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांना स्थानकातून बाहेर गाड्या काढण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या. यंत्रात बिघाड गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. बिघाडाची माहिती वरिष्ठांना देऊनही त्याच्या उपयोग होत नव्हता. काहीवेळा वाहक व प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडल्या.

वरिष्ठांच्या कानाडोळ्यांमुळे परिस्थिती उद्भवल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका वाहकाने दिली. पहाटे पाच वाजेपासून बसचे वाहक कर्तव्यावर रुजू झाले परंतु प्रवाशांना तिकीट येण्यासाठी यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती दिवसभर पाहायला मिळाली. यंत्र बिघाडाच्या घटनेने स्थानकामधून बस उशिरा धावत असल्याचा प्रकार समोर आला. पहाटेपासूनच बसचे वाहक व चालक नेहमीप्रमाणे ड्युटीला आले. परंतु, मध्यरात्री तिकीटच्या यंत्रात बिघाड झाल्यामुळे त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. बस स्थानकाच्या फलाटावर उपस्थित अनेक प्रवाशांनी थेट आगारात जाऊन कर्मचार्‍यांशी विचारपूस केली.

प्रवाशांना त्यांच्या नियोजनानुसार इच्छित स्थळे न जाता आल्यामुळे नियोजन कोलमडण्याची भावना व्यक्त केली. रोजगारानिमित्त बाहेर पडणार्‍या प्रवाशांनाही कसरतींचा सामना करावा लागला. तर वृद्ध,दिव्यांग,अपंग व रुग्णांना औषधोपचारासाठी बाहेर गावी जाण्यास उशीर झाल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला.
नेट कनेक्टिविटीमुळे तांत्रिक बिघाड
वादळामुळे कनेक्टिव्हिटी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्याच्या परिणाम तिकीट काढण्याच्या ईटीआयएम यंत्राला होतोय. बीएसएनएल कार्यालयाला कनेक्टिव्हिटी सुरळीत करण्याचे पत्र दिले असून, उत्तमोत्तम दर्जाची इंटरनेटची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. जेणेकरून यंत्रणांमध्ये बिघाड होणार नाही व सेवा सुरळीत पार पडेल.
मनोज तिवारी
स्थानक प्रमुख

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!