मतदान यंत्र सेटींग-सिलिंग कामास सुरुवात

यंत्राची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून घ्यावी,जिल्हाधिकार्‍यांची दुर्गम भागातील मतदान केंद्राना भेट

0
नंदुरबार । नंदुरबार लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदार संघाच्या ठिकाणी मतदानासाठी व राखीव ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्रांच्या सेटींग आणि सिलींगचे काम आज वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.

प्रत्येक बॅलेट युनिटवर मतपत्रिका बसविण्यात येणार आहे. प्रत्येक यंत्रावर प्रत्येक उमेदवारास एक मत देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. एकूण यंत्रापैकी 5 टक्के यंत्रावर मॉकपोल घेण्यात येणार आहे. यंत्रांची निवड यादृच्छिक पद्धतीने करण्यात येईल. त्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी सज्ज असेल. 28 तारखेलया या यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात येणार आहे.ही प्रक्रीया 24 एप्रिलपर्यंत सुरू रहाणार असून उमेदवार किंवा प्रतिनिधी याठिकाणी हजर राहू शकतात. विविध तालुक्यात प्रशिक्षणासाठी वापरलेल्या 70 मतदानयंत्रे अक्कलकुवार तहसील कार्यालयात नेण्यात येऊन तेथे प्रथमस्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. दुर्गम भाग असल्याने अतिरिक्त राखीव यंत्रे म्हणून त्यांचा आवश्यकतेनुसार उपयोग करण्यात येईल.

यंत्राची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून घ्यावी
नंदुरबार लोकसभा मतदार संघ निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग होत असून या यंत्राची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.

अक्कलकुवा येथे आयोजित निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र दुडी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, राजेंद्र थोटे उपस्थित होते.श्री.मंजुळे म्हणाले, मतदान कर्मचार्‍यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदान यंत्राचा अधिकाधिक सराव करावा. निवडणूक प्रक्रियेविषयी असलेल्या शंकांचे निरसन वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करून घ्यावे. मतदानाच्यावेळी होणार्‍या चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दुर्गम भाग असूनही कर्मचारी निवडणुकीची चांगली तयारी करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मतदार जागृती उपक्रमावर अधिक भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकार्‍यांची दुर्गम भागातील मतदान केंद्राना भेट
जिल्हाधिकारी मंजुळे यांनी अक्कलकुवा मतदारसंघात नर्मदाकिनारी असलेल्या दुर्गम मतदानकेंद्रना भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली. त्यांनी माणिबेली, धनखेडी आणि चिमलखेडी मतदान केंद्राची पाहणी केली. या मतदानकेंद्रावर जाण्यासाठी बार्जचा उपयोग करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी बार्जने प्रवास करून मतदान साहित्य आणि कर्मचार्‍यांच्या वाहतुकीबाबत माहिती घेतली. या भागातील मतदान केंद्र पथकाला नियोजित वेळी पोहोचता यावे यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रतिकूल परिस्थितीत कर्मचारी करीत असलेल्या मतदान तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. माणिबेली गावात 5, चिमलखेडी 7, डनेल 15, धनखेडी 6 आणि मुखडी गावात 7 पाडे आहेत. तर या गावातील मतदारसंख्या अनुक्रमे 325, 406, 803, 160 आणि 282 इतकी आहे. नर्मदा किनार्‍यावरील मतदानकेंद्रांची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी ए. के.मालसे आणि आर.आर.पाटील हे पहात आहेत.

अक्कलकुवा ते मोलगीमार्गे गमन बार्जपॉईंटपर्यंत 66 किमी अंतराचा प्रवास जीपने होणार असून त्यानंतर 2 बार्जने मतदान पथके या पाच गावात पाठविण्यात येतील.त्यानंतर नदीकिनार्‍यापासून 150 ते 200 मीटर अंतरापर्यंत 10 ते 15 मिनिटात पथके पायी पोहोचतील. माणिबेली आणि चिमलखेडी येथे बीएसएनएल नेटवर्क असून इतर भागासाठी पोलीस वायरलेस विभागाकडून सिंदूरी येथे रिपीटर बसविण्यात येईल, तर चिमलखेडी आणि गमन येथे स्टॅटिक वायरलेस संच उभारण्यात येणार आहे. या मतदान केंद्रावर रनर देखील ठेवण्यात येणार आहे. या पाचही मतदान केंद्रावर अतिरिक्त ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट देण्यात येतील. या भागासाठी दोन स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. धनखेडी व मुखडी येथे शासकीय इमारत नसल्याने तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. माणिबेली हे राज्यातील एक क्रमांकाचे मतदान केंद्र आहे.

LEAVE A REPLY

*