आदिवासींचे आरक्षण अबाधित

मुख्यमंत्री ना.फडणवीस यांचे आश्वासन

0
नंदुरबार । जोपर्यंत केंद्रात मोदी सरकार आहे, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

येथील भाजपा उमेदवारी डॉ.हीना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीरसभेत ना.फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान ना.मोदी यांना चौकीदार चोर आहेत असे म्हटल्याप्रकरणी राहूल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयात त्यांना माफ करेल की नाही ते माहिती नाही पण जनता त्यांना माफ करणार नाही. राहूल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाही कारण जी स्क्रीप्ट हातात येते त्याप्रमाणे ते बोलतात. मोदीसारख्या नेत्याने देशाला स्वाभिमान दिला. बॉम्बस्फोट घडविणार्‍यांना पाकिस्तानात घुसून धडा शिकवला. हा नवीन भारत मोदी घडवत आहेत. नंदुरबार व धुळे या दोन्ही जिल्हयातील सिंचनासाठी 2 हजार कोटी केंद्र सरकारने दिले आहेत. अनेक गावांना पहिल्यांदाच वीज आली, हजारो लोकांना गॅस मिळाला. नंदुरबारात निवडणुका आल्या की एक काँग्रेसची लबाड टोळी आदिवासींमध्ये तुमचे आरक्षण काढून घेतील अशी अफवा पसरवते. पण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत तुमच्या आरक्षणाला हात लावणार नाही. आम्ही देणारे लोक आहेत, काँग्रेसचे लोक काढणारे आहेत. जिल्हयात मेडीकल कॉलेज व इतर प्रश्न निश्चित पूर्ण केले जातील, असेही ना.फडवणीस यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे म्हणाले, भारताच्या लष्काराची क्षमता वाढविण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. भाजपाने शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून प्रलंबित सुलवाडे व इतर सिंचन प्रकल्पांना गती दिली. त्यामुळेच 200 गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. युवकांना रोजगारासाठी कारखानदारी आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेचे जाळे रस्त्यांचे जाळे मुलभूत प्रश्न सोडवण्यात आले. त्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्हयात रोजगाराचा संधी उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.

उमेदवार डॉ.हीना गावित म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने 70 वर्षात जे काम केले नाही ते काम मोदी सरकारच्या काळात पाच वर्षात झाले. जिल्ह्यात महिला बचत गटांना 500 पेक्षा जास्त सोलर ड्राय उपलब्ध करून दिल्याने पाच हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त घरकुले दिले आहेत. राहिलेल्यांना 2022 पर्यंत घरकुल देण्याचे काम पूर्ण होणार आहे. याशिवाय जिल्ह्यात शिक्षणासाठी इंग्लिश मॉडर्न स्कूल, गॅस वाटप, विद्युतीकरण आदी कामे आली आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्यांचा उपयोग करून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*