Type to search

नंदुरबार

पालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी

Share

नवापूर । सध्या शहरातील पाणीपुरवठयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. नगरपालिकेवर मोर्चे आणून अधिकारी व कर्मचार्‍यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत त्वरीत उपाययोजना करावी, अन्यथा कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचून त्याचा कामकाजावर परिणाम होईल, असे निवेदन नगरपालिका कर्मचारी व अधिकार्‍यांनी नगराध्यक्षांना दिले आहे.

नवापूर नगरपरिषदेत पाण्याच्या प्रश्नासाठी शहरातील नागरीकांचा येत असलेल्या मोर्चाबाबत आज नवापूर नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी संघटना यांनी नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, नवापूर शहरात काही प्रभागात पाणी टंचाई जाणवत असून पाणीटंचाईचा सामना नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठया जिकीरीने पार पाडीत आहेत. काही प्रभागात पाण्याच्या समस्या असल्याने तेथील नागरीक नगरपरिषदेत पाण्यासाठी 25 ते 50 लोकांचा मोर्चा घेऊन मुख्याधिकारी यांच्या दालनात अनधिकृतपणे प्रवेश करुन मोठमोठयाने पाणी समस्येबाबत मुख्याधिकारी यांच्याशी हुज्जत घालत असतात.

त्यामुळे नागरीक व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्यात मोठा वाद होवून पर्यायाने हमरीतुमरी तसेच मुख्याधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हात उगारण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील रमजान महीन्यात नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया पराकाष्ठेने रंगावली धरणातून सोडलेले पाणी नवापूर शहरातील नदीपर्यंत आणून 15 ते 20 दिवस शहरातील पाणीपुरवठा सुरळी केला होता. नगरपालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटी तसेच रात्र बेरात्र न बघता धरणावर जावून पाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहे. या बाबीवर सर्वसाधारण सभेत चर्चासुध्दा झालेली आहे. इतर शहरात 3 ते 4 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. तरीदेखील तेथील नागरीकांची पाण्यासाठी ओरड नाही. परंतू नवापूर नगरपरिषद दररोज पाणीपुरवठा करुनदेखील याप्रमाणे नागरीकांनी नगरपालिकेवर मोर्चा आणुन प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे.

त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचून याचा परीणाम नगरपरिषदेच्या कामकाजावर होत आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष देवून कायदेशीर उपाय योजना करावी, अन्यथा भविष्यात काही वाद तसेच मारहाणीसारख्या घटना घडल्यास त्याचा गंभीर परीणाम नगरपरिषद कामकाजावर होईल. अधिकारी व कर्मचार्‍यांना संरक्षण देणे आवयक आहे. अन्यथा नगरपरिषदेतील कुठलाही अधिकारी व कर्मचारी सक्षमपणे त्याचे कर्तव्य पार पाडू शकणार नाही. निवेदनावर मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणे, कोषाध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष श्रीमती कमलबाई पवार, न.पा कार्यालय अधिक्षक अनिल सोनार, मिलिंद भामरे, प्रेमानंद गावीत, सुधिर माळी, सतिश बागुल, सचिन अग्रवाल, प्रशांत भट, वामन अहिरे, राजु गावीत, राजेंद्र चव्हाण, नथ्थु अहिरे, अशोक पवार, श्रीमती पुष्पाबाई सोलंकी, भरत सोनार, दिलीप मराठे, गिरीष सांगळे, विजय सामुद्रे, सुदाम नरभवर, जगदीश पेंढारकर, सलीम पठाण, अजय तांबोळी, प्रविण सामुद्रे आदींच्या सह्या आहेत. यावेळी नगरसेविका सौ.बबीता वसावे, मंगला सैन, सारीका पाटील आदी उपस्थित होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!